बोर्डी : शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार बुधवारपासून जिल्हाभरात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनामुळे डहाणू तालुक्यातील शाळांच्या वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण व विद्यार्थ्यांची थर्मल तपासणी करण्यात आली. तसेच, आरटीपीसीआर चाचण्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झालेल्या शिक्षकांनाच अध्यापनाची संधी देण्यात आली आहे.
१८ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी ते आठवी वर्ग बुधवारपासून सुरू झाले. या नव्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये असणारा आनंद आणि उत्सुकता दिसली नाही. तब्बल एक सत्र घरी अभ्यास केल्यानंतर शाळा प्रवेशाबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांमध्ये अवघडलेपण जाणवले. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता शिक्षक धावपळीत होते. शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी केली जात होती.डहाणू तालुक्यातील एकूण १२०० शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ७० टक्के शिक्षकांची तपासणी २२, २३ व २५ जानेवारीला तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व कासा तसेच आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. कोणीही पॉझिटिव्ह आढळलेले नाही. बुधवारी चाचणी घेण्यात आलेल्या शिक्षकांचा अहवाल मिळाल्यानंतरच त्यांचा विद्यार्थ्यांशी संपर्क येईल, अशी माहिती डहाणूचे गटशिक्षणाधिकारी राठोड यांनी दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजेनंतर सुट्टी देण्यात आली.
तलासरी तालुक्यातील सर्व माध्यमांतील २०६ शाळा उघडल्या आहेत. पाचवी ते आठवी शिकणाऱ्या मुलांची संख्या १७,०९८ एवढी आहे. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला. शिक्षक वर्गानेही शाळा सुरू होत असल्याने कोविड १९ चे नियम पाळत सॅनिटायझर, मास्क शाळेत उपलब्ध केले होते. कोरोनाच्या तब्बल दहा महिन्यांनंतर शाळेच्या आवारात पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट आणि शाळेची घंटा वाजल्याने शिक्षकांमध्येही उत्साह दिसत हाेता.
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. प्रशासनाकडून ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. पण, आदिवासी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कसह इतर अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसत होता. तर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग, सॅनिन्यझर, मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्क्रीनिंग केल्यानंतरच वर्गात प्रवेश दिला गेला.