- सुनिल घरतवसई - देशात गोव्याच्या खालोखाल नाताळाची धूम गाजते ती वसईत. त्यामुळेच दसरा-दिवाळी संपताच सुरू झालेल्या हळूवार थंडीत ख्रिस्तीजन वसईकरांसोबतच ख्रिस्तेतर वसईकरांना प्रतिक्षा लागते नाताळाची. वसई धर्मप्रांतातील वाडा-भिवंडी पासून ते वसई-पालघर, मोखाडा-विक्र मगड पर्यंतच्या ३७ धर्मग्रामामधून नाताळच्या महिनाभर आधीपासूनच ख्रिस्त जन्मउत्सवाचे वेध लागून चर्चेसमध्ये महिनाभर आधीच्या चारही रविवारी नाताळाच्या आगमन कालाचा विधी सुरू होतो.डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या रविवारी वसईतील चर्चेस मधून गुलाबी रंगाची मेणबत्ती लावण्यात येऊन प्रभू येशूच्या जन्माकडे आणि एकंदर नाताळाच्या प्रतिक्षेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत याची वातावरण निर्मिती सुरु झाली होती.अवघ्या चार दिवसावर आलेल्या नाताळाच्या पाशर््वभूमीवर हा सण अध्यात्म, भक्ती व श्रद्धेसोबतच आनंद, हर्ष, उल्हास आणि एकंदर जल्लोष घेऊन येणार असल्यामुळे त्यासाठी आता काऊंट डाऊन सुरू झाले आहे.वसईत घरटी प्रत्येकी एकतरी व्यक्ती नोकरी-उद्योगानिमित्त परदेशात असून, तो वर्षातून एकदा नाताळात वसईत येतोच येतो. चर्च, घरे, वाड्या, गल्ल्या व तळे सजविण्याचे काम आता वेगाने सुरू असून ठिकठिकाणी नाताळ गोठे बनविण्याच्या कामावर अंतिम हात फिरविला जात आहे. यासाठी लागणाºया वस्तूंनी वसई विरार परिसरातील बाजारपेठा सजल्या असून, सर्वत्र नाताळ तयारीच्या वस्तू खरेदीची लगीनघाई सुरू आहे. घरा-घरात फराळाच्या पक्वांनांची, केक बनविण्याची लगबग सुरू आहे.सांताक्लॉजचे लहान-मोठे आणि देशी-परदेशी बनावटीचे रंगीबिरंगी बाहुले, ख्रिसमस-ट्री, जिंगल बेल, कागदी व प्लास्टिकच्या स्टार सोबतच लाकडी स्टार (चांदण्या), विविध स्वरूपातील चॉकलेट बॅगा, नाताळासाठी खास तयार केलेले म्युझकिल लाईट, टेबल क्लॉथ, ग्रिटींग कार्डस, डोअर-मॅट, वेलकम बॅनर, लाइिटंग-ट्री, स्नो इफेक्ट, ख्रिसमस ट्री, सिगिंग अँड डान्सिंग कॅप, रंगीबेरंगी इकोफ्रेडली कॅडल्स व स्टार्स अशा शेकडो नाताळाच्या चीजवस्तूंनी बाजारपेठा गजबजल्या आहेत. नाताळ वस्तूंचे माणिकपूर येथील विक्रेते विनोद पटेल म्हणाले की, ११ ते १७ घटक प्रतिकृतींच्या रेडीमेड नाताळ गोठ्यांना यावर्षी मोठी मागणी आहे.रेडीमेड नाताळ गोठ्यांना यावर्षी मोठी मागणी असून रू. ५००/- ते ५०,०००/- पर्यंत किमतीचे विविध सजावट असलेले नाताळ गोठे आम्ही विकले. यंदा बाजारपेठा नाताळ सजावटीच्या चायनीस उत्पादनाबरोबरच पर्शियन व कोरीयन उत्पादनेही भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत.
नाताळ सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 2:21 AM