जव्हार : माळघर - दापटी ते वावर - वांगणी हा रस्ता खराब झाल्याचे कारण सांगत, एसटी महामंडळाने वावर वांगणी सरपंचांना पत्र पाठवून एस.टी. बंदची सूचना केली. मात्र, ही एस.टी. बंद होऊ नये, या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी गुरुवारी श्रमदान करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले.खंडीपाडा - माळघर ते वावर वांगणी या १३ कि.मी. रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजनेतून करण्यात आले. मात्र, या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही अजूनही ठेकेदाराचीच जबाबदारी आहे. मात्र, या वावर वांगणी रस्त्याचे काम केल्यानंतर हा ठेकेदार फिरकला देखील नाही. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून काही ठिकाणी रस्त्यावरील मोऱ्या तुटल्या आहेत. यामुळे एस.टी. चालकांना त्रास होत असून एस.टी. चालवणे धोक्याचे होत असल्याचे सांगत एस.टी. बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. एस.टी. बंद होऊन या भागातील नागरिकांची, विद्यार्थ्यांची, कर्मचाऱ्यांची गैरसोय म्हणून शासनाची किंवा ठेकेदाराची वाट न पहाता श्रमदान करून रस्त्याचे काम केले आहे.वावर - वांगणी भागात जवळपास १५ गावे असून, नाशिक जिल्ह्यातील काही गावे, तसेच सिल्वासा आणि गुजरातचा भाग लागून असल्याने त्या परिसरातील नागरिकांना, रुग्णांना किंवा बाजार करणाºया सगळ्यांनाच जव्हार हीच बाजारपेठ जवळ पडते. एस.टी. येथील नागरिकांसाठी सोयीची आहे. मात्र, खराब रस्त्याचे कारण देत एस.टी. बंद होणार म्हणून नागरिकांनी श्रमदानातून रस्त्याचे काम केले आहे.
एसटी बंद होऊ नये म्हणून नागरिकांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:16 AM