मीरारोड - वाहन चालकांच्या संपाचा फटका मीरा भाईंदर मधील पेट्रोल पंपांना बसला असून बहुतांश पंपांवर इंधन संपल्याने ठणठणाट होता. तर काही ठिकाणी इंधन भरण्यासाठी लांब रांगा लागल्या होत्या. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पेट्रोलपंपावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
केंद्र शासनाने वाहन चालकांसाठी आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात वाहन चालकांनी देशभर संप पुकारला आहे. वाहने बंद असल्याने मालवाहतूक ठप्प झाली आहे. इंधन पुरवठा करणारे टँकर देखील बंद असल्याने मीरा भाईंदर मधील पेट्रोल पंपांवरचे इंधन संपून ठणठणाट झाला आहे.
ज्या ठिकाणी थोडेफार इंधन होते तिकडे इंधन मिळावे म्हणून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टाकी फुल्ल करून घेण्यासाठी धडपड अनेकांची चालली होती. तर बहुतांश पेट्रोल पंपांवर इंधन संपलेले असल्याने ते पंप बंद करण्यात आले आहेत. पेट्रोलपंप वर वादविवाद होऊ नये तसेच गर्दी उसळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस देखील सतर्क झाले आहेत. शहरातील पेट्रोल पंपांवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.