अनिरुद्ध पाटील बोर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बोर्डीच्या किनारपट्टीवरील कांदळवनात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी भरतीने झाडांच्या फांद्यांना गुंडाळलेले प्लिस्टक, नायलॉन हटविण्याचे काम बोर्डी संयुक्त वन व्यवस्थापन कमिटी, वाईल्डलाईफ काँझर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन, जंगल कॅम्प टीम, जैव विविधता कमिटी आणि बोर्डी, घोलवड व बोरीगाव येथील निसर्गप्रेमींनी केले.
समुद्रकिनाऱ्यालगत आणि खाडीतील खारफुटींच्या झाडांच्या फांद्यांना व बुंध्याना भरतीच्या पाण्यासह वाहून आलेला कचरा, पॉलीथिन व नायलॉन धागे गुंडाळले जाऊन कालांतराने ही झाडं मृत पावतात. जमीनधारित वृक्षांपेक्षा ते आॅक्सिजन अधिक देतात आणि त्यांची बुडालेली मुळे लहान मासे, क्रस्टेसियन, करड्या आणि इतर समुद्री जीवांसाठी नर्सरी म्हणून काम करते. मॅन्ग्रोव्ह वन अत्यंत गरजेची असून ते जमिनींची धूप होऊ देत नाही. टायफून आणि त्सुनामीच्या काळात मॅन्ग्रोव्ह नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतात. या हिरव्या भिंतीचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन या वनांत स्वच्छता मोहीम राबविल्याची माहिती प्राणीमित्र सुर्यहास चौधरी यांनी दिली.ग्रामपंचायतीचे युवा सदस्य सौमिल राऊत यांनी पर्यावरण प्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन केले. बुधवारी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात निसर्गउद्याना मागील समुद्रकिनारी ही मोहीम राबविली.
या कांदळवन स्वच्छता मोहिमेमुळे सागरी पर्यटन स्थळाला झळाळी आली. शिवाय स्थानिक मासेमारी व्यवसायाला ही हातभार लावण्याकरिता स्थानिक एकत्रीत आले ही पर्यावरणाकरिता सकारात्मक बाब आहे. - सौमिल राऊत, सदस्य, बोर्डी ग्रामपंचायत