पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक व टंकलेखकपदे भरतीच्या १३४ जागांसाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परीक्षेची नवी तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक व टंकलेखकच्या १३४ जागांसाठी २४ हजार ९६८ परीक्षार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १७ हजार १९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर ७ हजार २७० परीक्षार्थी गैरहजर राहिले होते. त्यांच्या परीक्षेसाठी पालघर व वसई तालुक्यांतील ५७ केंद्रांवर आसनव्यवस्था ठेवण्यात आली होती. पालघरमधील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रामध्ये दोन परीक्षार्थी मुले केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी असतानाही चोरून मोबाइलमधून उत्तरांची देवाणघेवाण करीत होते. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. यातील एका विद्यार्थ्याचा मोबाइल स्विच्ड आॅफ आढळून आला, तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या मोबाइलवर परीक्षा संपण्याच्या पंधरा मिनिटे आधी अनेक पातळीवर गोपनीयता राखूनही प्रश्नपत्रिका बाहेर गेल्याने यामागील खऱ्या सूत्रधारांचा शोध खोलात जाऊन घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही परीक्षार्थ्यांना अटक केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका अनेक परीक्षार्थ्यांपर्यंत पोहोचली असल्याची शक्यताही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली व त्यातून गैरफायदा घेऊन इतर अनेक अपात्र उमेदवारांची निवड होण्याची भीतीही या वेळी त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या वेळी परीक्षेला गैरहजर असणाऱ्या ७ हजार २७० परीक्षार्थ्यांनी परीक्षा फी भरल्यास त्यांना पुढील परीक्षेसाठी पात्रही ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील परीक्षेचे वेळापत्रक लवकरच परीक्षार्थ्यांना मिळणार असून हॉल तिकिटे आॅनलाइन मिळतील, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)आमिषे दाखविली होती- ज्या प्रेसमध्ये या प्रश्नपत्रिकेची छपाई करण्यात आली, त्या प्रेसमधील मालकापासून कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे व त्यांना आमिषे दाखवून प्रश्नपत्रिका मिळविण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून केला जात असल्याचे व्हॉटसअप मेसेजवरून आढळून येत होते.
लिपिक परीक्षा रद्द
By admin | Published: October 06, 2015 12:24 AM