हितेन नाईक
पालघर : समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने सातपाटीसह किनारपट्टीवरील अनेक घरात पाणी शिरले. त्याच बरोबरीने जिल्ह्यात एका पाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता अचानक पर्यावरणात बदल होत समुद्राच्या पातळीत झालेली वाढ, चक्रीवादळाच्या घटना या भविष्यातील एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना? अशी भीती आता गावा-गावातल्या नागरिकांना सतावू लागली आहे.
काही वर्षांपासून वातावरणात होत असलेले बदल जिल्हावासीयांना प्रकर्षाने जाणवू लागले असून आॅक्टोबरचा पूर्ण महिना परतीच्या आणि अवकाळी पावसाच्या नावाने वाहून गेला असून दिवाळीत कधी नव्हे तो पहिल्यांदाच मुसळधार पाऊस कोसळल्याने लोकांवर पावसात दिवाळी साजरी करण्याची वेळ आली. निसर्गाकडून सर्वाना हा धोक्याचा इशारा अनेक घटनांमधून दिला जात असतानाही शासनासह लोकांमध्येही याबाबत अजूनही गांभीर्य दिसत नाही. वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, प्रदूषण या विरोधात जनमानसात प्रचंड चीड असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून आपला रोष व्यक्तही केला आहे. जिल्ह्यातील सुखकर जीवन विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याच्या प्रकल्पा विरोधात जिल्ह्यातील जनता आता एकवटत असून त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होण्याच्या दृष्टीने लहान-मोठी आंदोलने उभी राहत आहेत. या आंदोलनात तरुणांचा वाढता सहभाग ही कौतुकाची बाब आहे.डहाणूमधील वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात ५ हजार एकरवर भराव घालण्यात येणार असून पूर्वेकडील आपल्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतील डोंगर फोडले जाणार आहेत. प्रचंड प्रमाणात दगड, विटा, रेती, माती, सिमेंट याचा वापर केला जाणार असून हे बंदर उभारल्यास मत्स्यसंपदा नष्ट होत हे हरित पट्टे उद्ध्वस्त होणार आहेत. ज्या वाढवणच्या समोरील भागात बंदर उभारणीचा प्रस्ताव आहे. हा व्ही आकाराचा असल्याने भराव टाकून प्लॅटफॉर्मची निर्मिती केल्यानंतर भरतीचे पाणी उत्तरेकडे डहाणू तर दक्षिणेकडील चिंचणी, तारापूर या दोन भागाकडे जात अनेक गावांना त्याचा फटका बसणार आहे. तर नांदगाव येथे प्रस्तावित जिंदाल जेट्टीच्या उभारणीला शासन पातळीवरून परवानग्या मिळाल्या असून हे बंदर झाल्यास उच्छेळी-दांडी, नवापूर, आलेवाडी, मुरबे, सातपाटी, वडराई ही गावेही प्रभावित होणार आहेत. सातपाटी, मुरबे, वडराई गावातील अनेक घरात समुद्राचे पाणी घुसण्याच्या प्रकार वारंवार घडत असताना आता या दोन्ही बंदराच्या उभारणीचा मोठा फटका भविष्यात बसून अनेक गावे पाण्याखाली जाण्याची भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
एकीकडे या सर्वसामान्य नागरिकांना उद्ध्वस्त करणारी बंदरे प्रस्तावित असताना दुसरीकडे त्यांचा श्वास कोंडून त्यांना गंभीर आजाराद्वारे हळूहळू मरणयातना देण्याचा प्रयत्न तारापूर एमआयडीसीमधील काही प्रदूषण करणाऱ्या कारखान्यातून होत आहे. तारापूर एमआयडीसी देशातली प्रदूषण करणारी एक नंबरची औद्योगिक संस्था बनली असून प्रदूषणाचे विपरीत परिणाम जनमानसावर होऊ लागले आहेत. विकास हा जनसामान्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी होणे अपेक्षित असताना पालघर जिल्ह्याचा चोहोबाजूने कोंडमारा सुरू आहे. वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, डहाणूचा अदानी औष्णिक प्रकल्प, बुलेट ट्रेन, एमआयडीसी प्रदूषणाची पाईपलाईन, एमएमआरडीएची डहाणूपर्यंत वाढविण्यात आलेली हद्द आदी विकासाच्या नावाखाली येणाºया प्रकल्पांआधीच जिल्ह्यात भूकंप, पूर, पावसाचा धुमाकूळ, नानाविध आजार आदी संकटाच्या विळख्यात जिल्हावासीय होरपळू लागला आहे.दरम्यान, जिल्ह्यात ११ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू झालेल्या भूकंपाचे धक्के थांबायचे नाव घेत नसून आजपर्यंत भूकंपाचे २५ ते ३० धक्के बसले आहेत.हे धक्के बसण्याचे कारण काय? त्याचा केंद्रबिंदू कुठे आहे? हे सत्र थांबविण्याच्या उपाय योजना काय? याबाबत कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याचे दिसत असून एखाद्या मोठ्या जीवघेण्या घटनेला आम्हाला सामोरे जावे लागल्यानंतर शासन जागे होणार आहे का? त्यापेक्षा या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढून आमच्या मनातील भीती दूर करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.कोणताही प्रकल्प येवो अथवा न येवो तरीही येत्या वीस वर्षात मुंबईसह भारतात सर्वत्र किनारे बुडणार आहेत अणि हे सगळं वातावरणात कार्बन डाय आॅक्साईडचे प्रमाण ४०० पीपीएमपर्यंत माणसाने पोहोचवण्याचे परिणाम आहेत. आत्ता या क्षणी भारतात काय जगभरात सर्वत्र कार्बन उत्सर्जन शून्य केलं पाहिजे. तर उलट वाढवण बंदरासारखे प्रकल्प आणून समुद्रात भराव करून, लाखो टन कोळसा आयात केला जाणार आहे. ज्या मुळे जागतिक तापमान वाढीच्या प्रक्रि येला आणखी वेग दिला जाईल आणि परिणामी जे वीस वर्षात पहायचयं ते दहा वर्षात सरकार करून दाखवतील आणि किनारपट्टी बुडवून जातील.- प्रो.भूषण भोईर,पर्यावरण तज्ज्ञ,पालघर