- अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : तीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील एकूण १२९ प्राथमिक शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना लगतच्या १ किमी अंतरावरील सोईस्कर ठरणाऱ्या शाळेत समायोजित करण्याच्या प्रक्रियेला पालघर जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या १२९ शाळा बंद होणार आहेत. ही कार्यवाही १५ जुलैपर्यंत पूर्ण करून सरल प्रणालीत समायोजित करून ३१ जुलै अखेरपर्यंत स्टुडंट पोर्टलला समावेशीत करण्यात येणार आहे. दरम्यान या धोरणामुळे जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांची रिक्तपदं भरली जाणार असून नववीच्या अतिरिक्त तुकड्या निर्माण होऊन प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासह विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होईल, असा विश्वास जिल्हा शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २०११ नुसार प्राथमिक शिक्षणासाठी १ किमी अंतराची अट निर्धारित केली आहे. त्या नियमांच्या अधीन राहून ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या ३० पेक्षा कमी आहे, त्या शाळेतील विद्यार्थी त्यांना सोईस्कर ठरणाऱ्या १ किमी अंतराच्या आत असलेल्या अन्य शाळेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. या बंद होणाऱ्या शाळांचे अभिलेख नियमाप्रमाणे दुसऱ्या शाळेने जतन करून ठेवायचे आहेत. शिवाय अशा शाळेतील शिक्षकांना रिक्तपदं असणाऱ्या शाळेत अध्यापनासाठी पाठवून त्या समायोजित शिक्षकांचा प्रस्ताव कार्यालयाला सादर केला जाणार आहे. याबाबतचे आदेश तालुका प्रशासनाला प्राप्त झाले असून कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील १२९ शाळा बंद होणार असून त्या मध्ये पालघर ३८, डहाणू ३१, जव्हार २३, वसई २२, विक्र मगड १०, मोखाडा ५ आणि तलासरी १ या तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. या निर्णयाची अमलबजावणी झाल्यानंतर शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढणार आहे. आठवीच्या वर्गाला नववीचा वर्ग जोडल्याने प्रवेशाचा प्रश्न संपुष्टात येईल. शिक्षकांची रिक्तपदं भरली जाऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल. शिवाय जिल्ह्यातील ६०० शाळांचा दुरु स्तीचा प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये बंद होणाऱ्या शाळांचाही समावेश असल्याने भौतिक सुविधांवर होणारा खर्च वाचणार आहे. हे सर्व मुद्दे शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले होते. त्यासह राज्याच्या शिक्षण विभागाकडे सादरीकरण केले होते. त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबाजवणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी रायगड जिल्हा परिषदेने या पद्धतीचा निर्णय घेतला होता, मात्र अंलबजावणी केली नव्हती. अशी माहिती पालघर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली. या निर्णयाने कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून तर, शिक्षक नोकरीपासून वंचित राहणार नसल्याने शिक्षक संघटनेकडून विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याची प्रतिक्रिया काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या धोरणामुळे विद्यार्थी प्रवेश, शिक्षकांची रिक्तपदं, शाळांच्या भौतिक सुविधा आदि प्रश्न सुटतील. त्यानुसार ३० पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हातील १२९ शाळा बंद करून, विद्यार्थ्यांचे समायोजन लगतच्या १ किमी अंतराच्या क्षेत्रातील सोईस्कर अशा अन्य शाळेत केले जाणार आहे. -संगीता भागवत, प्राथमिक शिक्षणाधिकारी, पालघर जिल्हा परिषद
जिल्ह्यातील १२९ शाळा बंद
By admin | Published: July 16, 2017 2:14 AM