- सुरेश काटे, तलासरी
तलासरी दूरध्वनी केंद्राचे अधिकारी रामकृष्ण हरी कपटकर हे २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर दुसरा अधिकारी हजर न झाल्याने केंद्र वाऱ्यावर आहे. त्यातच गेल्या चार दिवसापासून केंद्र बंद पडल्याने ग्राहकाचे हाल होत आहेत. बँकांचे व्यवहार ठप्प झाले असून शासकीय कामकाज रेंगाळले आहे तलासरी दूरध्वनीकेंद्र अंतर्गत एक हजार दूरध्वनी ग्राहक असून, बँकांच्या १० लीज लाईन आहेत, तीन दिवसापासून दूरध्वनी केंद्र बंद पडल्याने हजारो ग्राहकांचा संपर्क तुटून इंटरनेट बंद पडले आहे. त्यातच लीज लाईनही बंद पडल्याने बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याने बँक ग्राहकांना रोकड मिळणे दूरापस्त झाले आहे दूरध्वनीकेंद्र तीन दिवसा पासून बंद पडूनही कोणीही जबाबदार अधिकारी तलासरीकडे न फिरकल्याने केंद्र सुरु होण्याची ग्राहकांना वाट पहावी लागणार आहे. डहाणू, बोईसरचे अधिकारी तलासरी दूरध्वनी केंद्र सुरु करण्याबाबत चालढकल करीत असल्याने तसेच दुरध्वनीही उचलत नसल्याने कल्याणचे जनरल मॅनेजर रूपे याच्याशी संपर्क साधला असता आज सकाळीच या बाबत मला माहिती मिळाली असून दूरध्वनी केंद्र सुरु करण्याची कार्यवाही करतो असे ओघम उत्तर त्यांनी दिले. बीएसएनएलचे घटत आहेत ग्राहकमंगळवार संध्याकाळ पर्यंत ना अधिकारी फिरकला तलासरीत ना दूरध्वनी केंद्र सुरु झाले खाजगी कंपन्यांच्या सेवा तलासरीत चांगल्या मिळत आहेत परंतु भारत दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बी एस एन एल चा ग्राहक खाजगी सेवाकडे वळत आहे