पालघर : डहाणू-वैतरणा दरम्यानच्या मासिक पासधारकांच्या पासवर ‘आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही है’ असे शिक्के मारण्याच्या प्रकाराबाबत मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत स्टेशन प्रबंधकाना जमिनीवर बसून निवेदन स्विकारण्यास भाग पाडल्या नंतर रेल्वे प्रशासन नरमले. तात्काळ असे शिक्के मारण्याची प्रक्रिया थांबविण्यात येईल असे आश्वासन स्टेशन प्रबंधकानी आंदोलन कर्त्यांना दिले आणि हे आंदोलन मागे घेण्यात आले.‘मासिक पासधारकांना नो एंट्री’ या मथळ्याखाली लोकमतने प्रवाश्यांच्या गैरसोयींबद्दल वृत्त प्रसिद्ध केले होते. डहाणू-वैतरणा भागातील रेल्वे प्रवास्यांची आरक्षित डब्यांमधून प्रवास करण्यासाठी घातलेल्या बंदी मुळे त्यांच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत च्या वृत्ताची दखल घेत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मनसे स्टाईलने आक्र मक आंदोलन करत स्टेशन प्रबंधक कोहली यांना जाब विचारला. मनसेने आक्र मक पवित्रा घेतल्या नंतर रेल्वे पासवर अशा पद्धतीचे शिक्के मारणे संयुक्तिक नसल्याचे मत प्रशासना मान्य केले. चर्चे अंती स्टॅम्प मारण्याचा प्रकार बंद करण्यात येत असल्याची माहिती कोहली यांनी दिली. मनसेच्या आक्र मक आंदोलनाचे स्वरूप पहाता पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता.प्रवाश्यांच्या पासवर यापुढे पश्चिम रेल्वेने अशा पद्धतीचे शिक्के मारले किंवा येथील प्रवाश्यांवर कारवाई केली तर मनसे आणखीन उग्र होईल व तेव्हा पक्षाचा झेंडा व ज्याने असे केले त्याची पाठ असा अल्टिमेटम यावेळी संखे यांनी रेल्वे प्रशासनास दिला आहे. यापूर्वीसुद्धा मनसकडून बोईसर येथे पादचारी पुलासाठी केलेल्या आंदोलनाची आठवण त्यांनी करून दिली. त्यानंतर त्यांनी स्थानक परिसरात असे शिक्के मारलेल्या पासांची होळी केली.६ मेला संयुक्त बैठकप्रवाश्यांच्या विविध समस्या व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण या भागातील प्रवासी व रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक ६ मे रोजी पालघर रेल्वे स्थानक परिसरात घेणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यापुढे या भागातील रेल्वे प्रवाश्यांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी मनसे सैदव प्रयत्नशील राहणार असून प्रवाश्यांच्या समस्यांना घेऊन गरज पडली तर मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. या आंदोलनात त्यांच्यासह सुनील राऊत व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.या संधर्भात स्टेशन प्रबंधक सी एच कोहली ह्यांच्याशी अनेक वेळा संपर्क करूनही त्यांनी आपला मोबाईल वरील कॉल उचलला नाही.
मासिक पासवरील शिक्के बंद; डहाणू-वैतरणा प्रवाशांना दिलासा, स्टेशन प्रबंधकांना दाखविली जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 2:54 AM