वसई : वसई विरारच्या किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी पोलिसांनी सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत समुद्रात गस्त वाढविण्यात आली असून सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. याशिवाय सर्व लॅण्डींग पॉर्इंटसची नाकाबंदी करण्यात आली आहे.दहशतवादी हल्ला सागरी मार्गाने होण्याची शक्यता गृहीत धरून सागरी किनारपट्टीवर पालघर पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते. गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस हे अभियान सुरू राहणार आहे. या अभियानात किनारपट्टीवरील पोलीस ठाणे, सागरी तटरक्षक दलाचा समावेश आहे. या अभियानासाठी सागरी पोलीस मित्रांची मदत घेण्यात येत आहे. स्पीड बोटीने किनारपट्टीवर गस्त घालण्यात येत असून संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात येत आहे. सर्व चेक पोस्टची सुरक्षा वाढवून नाकाबंदी आणि तपासणी करण्यात येत आहे. टेहळणी मनो-यावरून आढावा घेतला जात आहे. या अभियानाअंतर्गत किनारपट्टीवरील लॉजेस आणि हॉटेलातील तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी यापूर्वीच मच्छिमारांना ओळखपत्र दिली असून कुठलीही संशयास्पद वस्तू अथवा बोट आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
वसईच्या किनारपट्टीवर ‘सागरी सुरक्षाकवच’
By admin | Published: April 27, 2017 11:37 PM