वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस येथील कोका-कोला ही कंपनी वाडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीतील बंधाऱ्यातून पाणी उपसा करत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर डोहातील पाणीसाठा आडल्याने पाणीटंचाई निर्माण होऊन शहरवासियांच्या घशाला कोरड पडली आहे.वैतरणा नदीवरील सिद्धेश्वर बंधकाऱ्यातून वाडा शहराला पाणीपुरवठा केला जातो. याच नदीवर गांध्रे गावालगत असलेल्या बंधाऱ्यातून कोका-कोला कंपनी दररोज लाखो लिटर पाणी उपसते. त्यामुळे भूगर्भातील स्त्रोतातून पाणी वाहून गेल्याने सिद्धेश्वर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावते आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिल नंतर वाडा शहराला पाणीटंचाई भेडसावते. या स्थितीत वाडा शहरात कमी दाबाने व अल्पकाळ पाणीपुरवठा केल्याने शहरातील विविध नगरांमध्ये भीषण पाणीटंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कोका-कोलाने मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा केल्याने सिद्धेश्वर बंधाऱ्यातीली पाणीपातळी प्रचंड खालावली असून पुढील दहा दिवसही हा पाणीसाठा पुरेल की नाही अशी शंका आहे. वाडा शहर हे दिवसेंदिवस विस्तारत असून अनेक नगरे नव्याने वसत आहेत. पाणीसाठा कमी झाल्याने शहरातील नगरांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे. शहरातील शिवाजीनगर, विनेकनगर, सोनारपाडा, विष्ण्ूनगर आदी भागात केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करता-करता ग्रामपंचायतीच्या तोंडचे पाणी पळाले आहे.उपसरपंच रोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोका कोलाच्या प्रचंड उपशामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावली असून शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते आहे. कोका कोला ज्या बंधाऱ्यातून पाणी उचलते त्यातून वाडा शहराला पाणी मिळावे, अशी मागणी शासनाकडे केल्याचे सांगितले. (वार्ताहर)
कोकाकोलाच्या उपशाने वाड्याला कोरड
By admin | Published: May 24, 2016 2:36 AM