पालघर/विरार : जिल्ह्यातील कोरोनाला वेळीच आवर घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कारवाईला सुरुवात केली असून तीन लग्न समारंभात धाड घालून गर्दी जमविणे, मास्क परिधान न करणे आदी कोविड-१९ गुन्ह्यांखाली वधू-वर पित्यासह आयोजकांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हे दाखल केले. दरम्यान, वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहेत.
मागील दोन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे शासन पातळीवरून लक्षात येऊ लागल्यानंतर कोविड-१९ अंतर्गत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबींची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. मात्र त्यांच्या आवाहनाकडेही पूर्णतः दुर्लक्ष केले जाऊ लागल्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे अस्त्र उगारण्यात आले आहे.
रविवारी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे आदींनी उमरोळी, सातपाटी आदी ठिकाणी लग्नसमारंभात धाडी घालून वधू-वर पिता, कॅटरर्स आदींविरोधात गुन्हे दाखल केले.
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी पुढील आदेश येईपर्यंत पालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे विवाह समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती येणार नाहीत याची दक्षता घेण्याबरोबरच समाजिक अंतर, मास्कचा वापर व शासन आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.