मंगेश कराळे,नालासोपारा :- पोलीस आयुक्तालयात दर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपास करणार्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून गौरविण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात ६ गुन्ह्यांची उकल केल्याप्रकरणी ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सत्कार केला आहे. नायगांवच्या लवेश माळीच्या हत्याप्रकरणाचा तपास केल्याबद्दल गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या शाहूराज रणावरे यांना गौरविण्यात आले. एका व्यापार्याच्या अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल काशिमीऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना तर ५५ लाखांचे अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी तुळींजचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल गौरविण्यात आले. गॅस सिलेंडर चोरी करून विकणार्या टोळीला अटक करून मोबाईल आणि गॅस सिलेंडर चोरीचे ६ गुन्हे मध्यवर्ती गुन्हे शाखेने उघडकीस आणल्याबद्दल राहुलकुमार राख यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नायगांव येथे एका किचकट हत्येचा कोणताही धागा दोरा नसताना या प्रकरणाचा ७२ तासांत तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकाने लावला होता. या तरुणाची ओळख पटविण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मयताचे फोटो, अंगावरील कपडे व वस्तू यांचे तब्बल १ हजार पत्रके भिंतीवर चिपकवून व सार्वजनिक ठिकाणी वाटण्यात आली. त्याच्या पायातील दोरा आणि चप्पलमूळे ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले होते.
विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी चोरी व दुचाकी चोरणाऱ्या सराईत अजित कनोजिया (२३) आणि अश्रफ शेख (२४) या दोन आरोपींना अटक केली होती. या आरोपीकडून नऊ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेले ६ मोबाईल व ३ दुचाकी हस्तगत केली होती. तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यात अडवून हातचलाखीने लुटणार्या अजय-विजय या ठकसेनांच्या टोळीलाही विरार पोलिसांनी अटक केली होती. या दोन गुन्ह्याप्रकरणी विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना सर्वोत्कृष्ट तपासाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ५५ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मेफेड्रोन आणि गांज्यासह नायजेरियन ओमेकोसी चिबुझा डाकलाने (३८), नवोबासी चिबुजे (३८) आणि ओंये इकेना बेन्थ (३६) या ३ नायजेरियन आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल गौरविण्यात आले. तर गॅस सिलेंडर चोरी करून विकणार्या टोळीला अटक करून मोबाईल आणि गॅस सिलेंडर चोरीचे ६ गुन्हे मध्यवर्ती गुन्हे शाखेने उघडकीस आणले होते. याबाबत राहुलकुमार राख यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.