मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीची आयुक्त बालाजी खतगावकर यांनी गांभीर्याने दखल घेत कामचुकार स्वच्छता निरीक्षक आणि सहायक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईचा इशारा देणारी नोटीस बजावली आहे. शिवाय, उपायुक्तांनाही कर्तव्य बजावत नसल्याची जाणीव करून दिली.
पालिका प्रशासनातील जबाबदार अधिकारी असणारे संबंधित विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, सहायक सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी राजकुमार कांबळे व संदीप शिंदे, १३ स्वच्छता निरीक्षक तसेच संबंधित मुकादम यांच्याकडून प्रभावीपणे बंदी राबवण्यात कमालीची कुचराई केली जात आहे.नागरिकांच्या तक्रारींवरूनच काही प्रमाणात दोनचार स्वच्छता निरीक्षकच कारवाई करताना दिसत आहेत. सोमवारी मीरा रोड येथील भाजपच्या महिला पदाधिकारी रूपम झा यांच्या प्लास्टिक गोदामावर नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेने कारवाई करून सव्वा टन प्लास्टिकचा साठा जप्त केला. यातूनच बेकायदा प्लास्टिक विक्रीच्या व्यवसायात महापालिका प्रशासन आणि राजकारणी गुंतले असल्याच्या आरोपांना बळ मिळाले.
आयुक्त खतगावकरांनी याची गांभीर्याने दखल घेत उपायुक्त पानपट्टेंना समज दिली आहे. आपण जबाबदार अधिकारी असून सरकारी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य असताना, तसे होताना दिसत नाही, असे आयुक्तांनी समजपत्रात म्हटले आहे.सहायक अधिकारी संदीप शिंदे व राजकुमार कांबळे यांना नोटीस बजावून कर्मचाºयांवर तुमचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असून दोन दिवसांत प्रभावी कार्यवाही न केल्यास तुम्ही पुढील कार्यवाहीला पात्र ठराल, असा दम आयुक्तांनी भरला आहे. आयुक्त खरोखरच कारवाईचा बडगा उगारणार का हा खरा प्रश्न आहे.
एकूण १३ स्वच्छता निरीक्षकांनाही स्वतंत्र नोटिसा बजावून प्लास्टिकविरोधी कार्यवाहीत तुमचा हलगर्जीपणा होत असल्याने दोन दिवसांत कार्यवाही केली नाही, तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.