पालघर : पालघर रेल्वेस्थानकात पश्चिम रेल्वेकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभ्या असलेल्या कोरोना केअर ट्रेनमध्ये दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा रेल्वे फलाटावरील मुक्त संचार कोरोना पसरविण्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकत असल्याने याला वेळीच आवर घालण्याची मागणी केली जात आहे.केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चारशे बेड क्षमतेची कोरोना केअर कोच ट्रेन पालघर रेल्वेस्थानकात उपलब्ध करून दिली आहे. या ट्रेनमध्ये उपचार घेण्यासाठी पाच-सहा दिवसांपासून काेरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. या रेल्वे कोचमधून हे रुग्ण थेट प्लॅटफॉर्मवर व रेल्वेच्या परिसरात फिरत असल्यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांत पालघर ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. रुग्णवाढ थांबत नसल्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेडची कमतरता भासत होती. अतिगंभीर असलेल्या रुग्णांना असे बेड प्राप्त होत नसल्यामुळे त्यांना जिल्ह्याबाहेरची वाट धरावी लागत होती. त्यातच काही रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना पालघर जिल्ह्यात घडल्या आहेत.देशात विविध ठिकाणी दिलेल्या कोविड ट्रेनप्रमाणे पालघर जिल्ह्यासाठी कोरोना केअर कोच ट्रेन मिळावी, अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. जिल्ह्याचे खा. राजेंद्र गावित यांनीही रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून ट्रेन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने त्या अनुषंगाने निर्णय घेऊन पालघर जिल्ह्यासाठी ही ट्रेन दिली. या ट्रेनमध्ये सुमारे चारशे रुग्ण एकाच वेळी उपचार घेऊ शकतील, अशी त्याची रचना आहे. ही ट्रेन सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी असली तरी त्यात ऑक्सिजनची सुविधा आहे.
खबरदारीची सूचनारुग्णांच्या हलगर्जीपणामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे रुग्ण व त्यांचे नातेवाईक रेल्वे कोचच्या बाहेर पडून प्लॅटफॉर्मवर फिरत असल्यामुळे इतर सामान्य रेल्वे प्रवाशांना त्यांच्यापासून बाधा होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, अशी सूचना डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटनेचे सहसचिव प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.