वाडा : कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न करणाºया हिल्टन फोर्जिग मेटल कंपनीबद्दल कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. काम करीत असताना मशीनमध्ये हात अडकून एका कामगाराच्या उजव्या हाताची दोन बोटे निकामी झाली आहेत. मे महिन्यात ही घटना घडली. मात्र, या कामगाराला कंपनीने चार महिने पगार किंवा भरपाई न दिल्याने त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पगारही नाही आणि कामही नाही अशा द्विधा मनस्थितीत कामगार सापडला असून त्याने कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीकडे न्यायाची मागणी केली आहे.
वाडा तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत हिल्टन फोर्जिंग मेटल ही कंपनी आहे. या कंपनीत प्लाजेंसचे उत्पादन केले जाते. पाच वर्षापासून राघवेंद्र उर्फ जयलाल चव्हाण (वय ३५) हा कामगार येथे काम करीत असून तो हॅमर चालवायचा. ९ मे २०१९ रोजी कंपनी व्यवस्थापनाने त्याचे नेहमीचे काम सोडून त्याला दुसºया मशीनवर काम दिले. ते मशीन त्याला चालवता येत नसल्याने राघवेंद्र याचा हात मशीनमध्ये अडकून उजव्या हाताची दोन बोटे तुटून अपघात झाला. त्यानंतर त्याला नजीकच्या एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. उपचारादरम्यान कंपनी प्रशासनाने त्याला तू पोलिसांत तक्र ार करू नको, तुला भरपाई देऊ आणि कामावर ठेवू असे सांगितले. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली नसल्याचे तक्र ारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र चार महिने उलटूनही त्याला पगार किंवा भरपाई दिली जात नाही. राघवेंद्र हा परप्रांतीय कामगार असून तो, पत्नी व दोन मुले असे ते अंबाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. चार महिन्यांत पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. चार महिने घरभाडे न दिल्याने मालकानेही भाड्यासाठी तगादा लावला आहे.
मुलाच्या शिक्षणासाठी पैसेच नसल्याने मुलाला शाळेतून काढले असल्याचा आरोप तक्र ारीत केला आहे. हा कामगार आपल्या कुटुंबाचा मुख्य आधार असल्याने त्याच्या कुटुंबाच्या भविष्याचे काय ? असा प्रश्न चव्हाण कुटुंबियांना पडला आहे. राघवेंद्र याने कंपनीत जाऊन पगार द्या व कामावर ठेवा असे सांगितले असता तू व्यवस्थित झाल्यावर कामावर ये असे सांगून पगाराबाबत कंपनी प्रशासन काहीही बोलत नसल्याचा आरोप कामगाराने केला आहे.यासंदर्भात कंपनीचे मालक युवराज मल्होत्रा यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असता भेटल्यावर बोलू असे सांगत अधिक बोलणे टाळले.कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे राघवेंद्र या कामगाराला आपल्या हाताची बोटे गमवावी लागली असून कंपनी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. चार महिने त्याला पगार न दिल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडणार आहोत. तसे पत्र तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले आहे.- सुरेश भोईर, अध्यक्ष-शिवनेरी भुमिपुत्र कामगार संघटना