पालघर : कपासे (सफाळे) येथील ग्रामसेविका ग्रामपंचायतीच्या कामात सहकार्य करीत नसल्याची तक्रार सरपंच गजानन पागी यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामसभेचे कामकाज न चालविताच त्या उठून गेल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.पालघर तालुक्यातील सफाळे जवळील कपासे ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन पागी यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव पालघर तहसिलदारांनी मंजूर केल्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच पागी यांनी तहसिलदारांनी दिलेल्या निर्णयाविरोधात केलेल्या अपिलावर त्यांच्या बाजूने निर्णय लागल्याने गजानन पागी सरपंचपदावर विराजमान झाले होते. त्यांच्या हाती सुत्रे पुन्हा आल्यानंतर ग्रामसेविका सुचीता पाटील या काही राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन आपणास सहकार्य करीत नसल्याची तक्रार त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. आपण सरपंच असूनही ग्रामपंचायतीची कागदपत्रे पहाण्यासाठी उपलब्ध करून दिली जात नसल्याचे व ग्रा. प. कडे असलेल्या उपलब्ध निधीचा वापर विकासकामासाठी करीत नसल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे. सन २०१३ सालातील जनसुविधेची कामे करण्यात कुचराई करणे, ठाकूर पाडा, ठाणेपाडा येथील स्मशानभूमीच्या जागेत ते बांधणे, रस्ते, पाण्याची सोय, लाईटची सोय करणे, चबुतरा बांधणे इ. विकासकामे करावयाची बाकी असताना त्या तीे करीत नसल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. स्मशानभूमी व स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी आलेल्या लक्षावधी रू. च्या निधीचा विनीयोग केला जात नसून १९९५ ते १९९७ या कालावधीमध्ये ज्या रस्त्यावर ग्रामपंचायतीनी खर्च केला आहे. त्या रस्त्याबाबत आता ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याच्या नावाखाली पूर्वापार असलेल्या रस्त्यासाठी आलेल्या निधीच्या वापरास नकार देणे तसेच ७/१२ वर नोंद असलेल्या स्मशानभूमीसाठी निधी वापरण्यास जाणीवपूर्वक ग्रामसेविका टाळाटाळ करीत आहे, अशी त्यांची तक्रार आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायतीच्या कामकाजात माझे पूर्ण सहकार्य असते. स्मशानभूमीत रस्त्याच्या कामकाजाबाबत गटविकास अधिकाऱ्याने सुनावणी लावली आहे. त्यानंतर योग्य निर्णय घेऊ.- सुचिता पाटील, ग्रामसेविका
कपासे ग्रामसेविकेविरोधात तक्रार
By admin | Published: December 06, 2015 12:06 AM