लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : जिल्ह्यातील रुग्णांना मिळणारा ऑक्सिजनचा साठा पुरेसा असला तरी तो वाढत्या रुग्णसंख्येमुळे कमी पडू नये यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी तारापूर एमआयडीसीमधील ऑक्सिजन प्लांटला भेट देत ऑक्सिजन उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार २९७ वर पोहोचली असून, जिल्ह्यातील ३१ डीसीएच, तर आठ डीसीएचसी अशा एकूण ३९ रुग्णालयांतून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली केली जात आहे. या ३९ शासकीय आणि खाजगी कोविड रुग्णालयात ३४४ ऑक्सिजन बेडची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या शासकीय आदेशानुसार जिल्ह्याला रायगडच्या गॅस प्लांटमधून गॅस पुरवठा केला जात असला तरी मागणीच्या अनुषंगाने पुरवठा होत नसल्याने तारापूर एमआयडीसीमधून इतर कंपन्यांना पुरवठा करणाऱ्या विराज आदी कंपन्यांना भेट देऊन त्यांच्याकडून ऑक्सिजन साठा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.
दरम्यान, रिकाम्या सिलिंडरची आवश्यकता भासत असून, त्याची उपलब्धता व ऑक्सिजनच्या अतिरिक्त पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ आणि प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर यांनी गुरुवारी टिमा हॉस्पिटलला भेट देत दाखल रुग्ण, ऑक्सिजनची आवश्यकता, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता याबाबत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी डॉ. तृणाल पवार, डॉ. सादूरवाड यांच्यासह नर्स, स्टाफ यांच्याशी चर्चा करून आपण उत्तमरीत्या काम करीत असल्याने जिल्हा प्रशासन आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.