नालासोपारा : नायगावच्या सोपारा खाडीपुलाचे काम विविध समस्यांमुळे रखडले असून, मागील काही वर्षांपासून मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पीडब्ल्यूडी प्रशासन, तहसील कार्यालय व महानगरपालिका यांच्याकडे कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. दरम्यान, काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे, परंतु शुक्रवारी दुपारी पुलाच्या पश्चिमेकडील आरसीसी राफ्टमध्ये माती भराईचे काम सुरू असताना संपूर्ण राफ्ट खचल्याने चिंता व्यक्त होत आहे.
सोपारा खाडीवर नवीन पुलाचे काम पीडब्ल्यूडी विभागांतर्गत सुरू असून, काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु शुक्रवारी दुपारी पुलाच्या पश्चिमेकडील आरसीसी राफ्टमध्ये माती भराईचे काम सुरू असताना संपूर्ण राफ्ट खचला. त्यामुळे अशा प्रकारच्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी सभापती तथा स्थानिक नगरसेवक कन्हैया (बेटा) भोईर यांनी केली आहे.
सुरुवातीपासून असलेली कामाची रखडपट्टी व तात्पुरत्या रहदारीसाठी लावण्यात आलेले त्रासदायक जिने यामुळे नायगाव पूर्ववासीयांच्या सहनशीतलेचा अंत झालेला आहे. नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपुलामुळे खाडी पुलाच्या उतार मार्गातील फेरबदल व त्यामुळे निधीची भासलेली कमतरता लक्षात घेता, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने महानगरपालिकेमार्फत पीडब्ल्यूडी प्रशासनास १ कोटी १ लाख ७४ हजार रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे, परंतु निधी देऊनही चांगले काम करू शकत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.