नालासोपारा : राज्य सरकारने महिलांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास सुरू करण्याची घोषणा केली, पण महिला प्रवाशांना याच ट्रेनचा प्रवास करण्यासाठी लागणारे तिकीट किंवा पास काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळच्या सुमारास तर नालासोपारा रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम परिसरातील तिकीट खिडकीवर महिला प्रवाशांना एक ते दीड तास भली मोठी रांग लावून तिकिटे काढावी लागत असल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत.महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ठरावीक वेळेत प्रवासासाठी लोकल रेल्वेची सेवा सुरू केली. नालासोपारा रेल्वेस्थानकात महिला प्रवाशांची तिकिटासाठी भली मोठी रांग लागते. गेल्या २ ते ३ दिवसांपासून सोशल मीडियावर तिकिटासाठी दोन ते तीन तास ताटकळत उभ्या असलेल्या महिला प्रवाशांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेकडील रेल्वेस्थानकातील अर्ध्यापेक्षा जास्त तिकीट खिडक्या आणि ईव्हीएम मशीन बंद असल्याने तिकीट काढण्यासाठी गर्दी होत असल्याचा आरोप महिला प्रवाशांनी केला आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे प्राधान्याने लक्ष देऊन सर्व तिकीट खिडक्या आणि ईव्हीएम मशीन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी महिलावर्गाने केली आहे.
रेल्वेच्या प्रवासाची मुभा दिली, पण तिकिटे किंवा पासेस काढण्यासाठी एक किंवा दोन तास दररोज रांगा लावायला लागल्याने अतोनात हाल होत आहेत. बंद तिकीट खिडक्या आणि ईव्हीएम मशीन पूर्वरत सुरू कराव्यात.- आशा नेमाडे, संतप्त महिला प्रवासी