पारोळ : संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेली वसई विकास सहकारी बँकेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.५ आॅगस्ट) शांततेत पार पडली आणि विशेष म्हणजे बडोदा बँकेचे ९ कोटींचे डिफॉल्टर ठरलेले या बँकेचे चेअरमन हेमंत म्हात्रे यांच्यावर विश्वास व्यक्त करणारा ठराव या सभेत संमत करण्यात आला.आजी-माजी संचालक मंडळांसह, पालघर जिल्ह्यातील बॅकेचे भागधारक सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थीत होते. त्यामुळे आता बँक आॅफ बडोदाच्या थकबाकीप्रकरणी त्यांचा राजीनामा मागणारे आता कोणते पाऊल उचलतात याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.बॅकेचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रमेश म्हात्रे यांच्यावर विश्वास व्यक्त करतांना सभासद व भागधारकांनी बँकेच्या होत असलेल्या प्रगतीत म्हात्रे यांचा मोठा वाटा असल्याचे सांगीतले. यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप संत, सहा. महाव्यवस्थापक भास्कर राव, व्हा.चेअरमन जगदिश राऊत संचालक महेश म्हात्रे, आशय राऊत, केवल वर्तक, भालचंद्र कवळी,तनुजा राऊत, तृप्ती म्हात्रे व इतर संचालक व भागधारक सभासद मोठ्या संख्येने हजर होते. संचालक मंडळाने तयार केलेल्या सन २०१८-१९ च्या अंदाज पत्रकास यावेळी मान्यता देण्यात आली. चालू वर्षासाठी वैधानिक लेखा परिक्षकांची नियुक्ती तसेच धर्मदाय निधीसाठी विविध संस्थांकडून येणाऱ्या प्रस्तावास मंजुरी देण्याचा संचालक मंडळास अधिकार देण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. वसईतील किरवली गावात एका छोट्या लावलेल्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेली वसई विकास सहकारी बॅक ४ आॅक्टोबर १९८४ रोजी स्थापन झाली होती. बॅकेने अवघ्या काही वर्षात सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. २१ शाखांद्वारे ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरवणाºया व शेड्यूल्ड बॅकेचा दर्जा प्राप्त झालेल्या या बॅकेने जिल्ह्याबाहेरही ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर विश्वास संपादन केला आहे. पालघर जिल्ह्याबाहेर नाशिक व औरंगाबाद येथेही बॅकेने गतवर्षी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत.बँकेच्या ३१ मार्च २०१८ रोजी ठेवी २५०३.७८ कोटींवर गेल्या आहेत. सभासदांना दर्जेदार तसेच गतिमान सेवा देण्याकरिता बँक व्यवस्थापनाने आधुनिक तंत्रप्रणालीचा स्वीकार केला आहे. बॅकेने आपल्या कार्यकालात आदर्श बँक, पहिल्या क्रमांकाची उत्कृष्ट बँक, सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक, सर्वोत्कृष्ट सहकारी बँक, बेस्ट ब्रँच व बेस्ट डाटा सिक्युरिटी इनिशिएटीव्ह पुरस्कार, बेस्ट सी. ई.ओ.,बेस्ट डिजीटल मार्केटींग , बेस्ट न्यू हेड आॅफिस व बेस्ट अॅक्वायर हे पुरस्कार या अगोदरच मिळविल आहेत. बँकेच्या भरभराटीमध्ये सर्व आजी-माजी संचालक, कर्मचारी व विविध लोकप्रतिनिधींचे योगदान आहे. ३२ वर्षाच्या वाटचालीनंतर बँकेच्या मुख्यालयाचे स्वत:च्या मालकीच्या प्रशस्त अद्ययावत वास्तूमध्ये दोन वर्षापूर्वी स्थलांतर झाले आहे.>कष्टाने उभारलेल्या समाजाच्या बँकेची बदनामी टाळलीआज बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. समाजाने मोठ्या कष्टाने ही बँक उभारली आहे, नावारुपाला आणली आहे. तिच्या विरोधात माझे काहीच म्हणणे नाही. उलट मला तिचा अभिमान आहे त्यामुळेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी मी या विषयावर फारसे काही बोललो नाही. मला तिची बदनामी करायची नव्हती. मला जे काही संस्थेची प्रतिष्ठा राखण्यासाठी करायचे आहे ते मी माझ्या पद्धतीने योग्य वेळी व योग्य रितीने करणार आहे. फक्त त्याची वेळी आजची नव्हती एवढे मी लक्षात ठेवले होते, असे या प्रकरणी आवाज उठरविणारे बँकेचे सभासद समीर वर्तक यांनी म्हटले आहे.>माझा लढा अपप्रवृत्तींविरुद्ध -समीर वर्तकमाझा लढा ला बँकेविरुद्ध नसून तीमध्ये फोफावलेल्या अपप्रवृत्तींविरुद्ध आहे आणि तो मी माझ्या रितीने व सनदशीर मार्गाने सुरूच ठेवणार आहे. आजच्या या बैठकीत बँकेच्या महाव्यवस्थापकांनी माझ्या खात्याच तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला. ही बाब अनुचित अशी होती. कुठल्याही खातेदाराची माहिती बँक अशा रितीने सार्वजनिक करू शकत नाही आणि ती चूक त्यांनी केली आता त्यांना त्याचाही जबाब द्यावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेकडे, सहकार खात्याकडे आणि हाय कोर्टात दाद मागणे हे तीन मार्ग माझ्यापुढे आहेत. योग्य वेळी योग्य मार्ग मी निवडेन, असेही समीर वर्तक म्हणाले.>आता विरोधकांची खेळी कोणती?सभा वादळी होईल, अध्यक्ष राजीनामा देतील किंवा त्यांनी तो न दिल्यास त्यांची गच्छंती होईल, अशी हवा असतांना अध्यक्षांवर विश्वास व्यक्त करणारा ठराव संमत झाल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या खेळीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.न्यायालयात अथवा सहकार खात्याकडे धाव घेणे हा मार्ग विरोधकांसाठी खुला आहे. एक तर्क असा आहे की, अध्यक्षपदाची शान राखण्यासाठी अध्यक्षांवर विश्वास व्यक्त करणारा ठराव संमत करायचा नंतर अध्यक्षांनी राजीनामा द्यायचा असे घडेल.
म्हात्रेंवर विश्वास ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:15 AM