नंदकुमार टेणीपालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयाला काँग्रेसचे दामू शिंगडा आणि बविआचे बळीराम जाधव यांनी हातभार लावला असे मतदानाची आकडेवारी सांगते. ही लढत जर एकास एक झाली असती किंवा या दोन्हीपैकी एक जरी उमेदवार रिंगणात नसता तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते. कारण गावितांचा विजय हा फक्त २९,५७२ मतांनी झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार जरी रिंगणात नसता तरी चित्र बदलले असते. या मतदारसंघाचा इतिहासच असा आहे की, बहुरंगी लढतीत कोण कोणाची मते खातो त्यावरच इथला विजेता निश्चित होतो. या वेळीही तसेच झाले आहे. परंतु मुख्यमंत्री आणि भाजपाचे इतर श्रेष्ठी यांनी इतका जोर लावूनसुद्धा इतके अल्पमताधिक्य भाजपाला मिळाले आहे. २०१४च्या निवडणुकीत कोणताही फारसा जोर न लावता वनगा यांना विक्रमी मताधिक्य मिळाले होते. ते जवळपास अडीच लाखांच्या आसपास होते. त्यामुळे यापुढील लढती जितक्या कमी उमेदवारांत अथवा सरळ होतील तेवढा तो विजय निर्णायक ठरेल अशी स्थिती आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या दामू शिंगडा यांनीही हा विजय संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.शिवसेनेच्या वनगा यांना २,७२,७८२ तर बविआच्या बळीराम जाधव यांना २,२२,८३८ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या दामू शिंगडा यांना ४७,७१४ तर मार्क्सवादी उमेदवार किरण गहला यांना ७१,८८७ मते मिळाली आहेत. हे लक्षात घेता कोणी कोणाच्या विजयाला कसा हातभार लावला हे सहज लक्षात येते. शिवसेनेने येथे लोकसभेची प्रथमच निवडणूक लढविली. तरीही २,७२,७८२ मते मिळविली. यामुळे २०१९मधील निवडणुकीत शिवसेनेचे आव्हान असेल हे स्पष्ट झाले आहे. यामुळे या पक्षांचे २०१९मधील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार कोण असतील व त्यांचे पक्षीय बलाबल कसे असेल याचीही चुणूक दिसली.
काँग्रेस, बविआने लावला गावितांच्या विजयाला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:12 AM