लोकमत न्यूज नेटवर्क
वसई:वसई विरार शहर महानगरपालिका आय प्रभागातील निलंबित करअधीक्षक थॉमस रोड्रिंक्स यांनी सुट्टीच्या दिवशी (सरकारी) आय प्रभाग वसई येथिल कार्यालयात जाऊन काही संशयित कागदपत्रे पांढऱ्या गोणीत भरून इतरत्र नेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
दरम्यान त्याचे सीसीटीव्ही फूटेज मनपा कडे उपलब्ध आहेत, त्यामुळे सदर प्रकरणातील त्या निलंबित केलेल्या कर अधीक्षका विरुद्ध वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवावा म्हणून काँग्रेस पक्षातर्फे वसई तालुका इंटक काँग्रेसचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी वसई विरार मनपाच्या आय प्रभाग समिती चे सहा.आयुक्त व वसई पोलिस निरीक्षक यांचे कडे लेखीअर्जा द्वारे मागणी केल्याचे शिंदे यांनी लोकमत ला सांगितले.
या संदर्भात अधिक बोलताना शिंदे यांनी सांगितले की, नुसते निलंबन नकोत तर येत्या सात दिवसात मनपा सहाय्यक आयुक्तांनी वसई पोलिस ठाण्यात त्या निलंबित कर अधीक्षक थॉमस रोड्रिंक्स यांचेवर गुन्हा नोंदवला नाही तर काँग्रेस पक्षातर्फे आय प्रभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा ही लोकमत शी बोलताना दिला आहे. त्यामुळे आता सहाय्यक आयुक्त आणि वसई पोलीस निरीक्षक या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात याकडे तमाम वसईकरांचे लक्ष लागले आहे.