काँग्रेसचा स्वत:च्या पायावर धोंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:14 AM2018-06-01T06:14:14+5:302018-06-01T06:14:14+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशभर भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत
अतुल कुलकर्णी
मुंबई : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशभर भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत असताना महाराष्टÑात मात्र काँग्रेसने आपल्या पायावर स्वत:च्या हाताने धोंडा पाडून घेतला आहे. देशभर इतरत्र झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यांनी भाजपाला पराभूत केले. तसे करणे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शक्य असतानाही प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शक्ती नसताना पक्षाचा उमेदवार देऊन नामुष्की ओढवून घेतली आहे.
पालघरची जागा भाजपाने जिंकली पण काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेण्यात घातलेल्या घोळामुळे ही वेळ आली आहे. पालघर पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्या, असे म्हणत माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित पक्षाच्या सगळ्या नेत्यांना भेटले. दया याचना केली मात्र तुम्ही निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही दामोदर शिंगडा यांनाच उमेदवारी देऊ असा आग्रह काही नेत्यांनी धरला. आता परिस्थिती बदलली आहे, शिंगडा निवडून येणार नाहीत, असे सांगूनही राजेंद्र गावित यांचे ऐकले नाही. गावित भाजपाकडे गेल्यानंतर त्यांना तिकीट नाकारणाऱ्यांनी; आमचा उमेदवार पळवला, भाजपाकडे उमेदवार नाहीत, त्यांना उमेदवार आयात करावे लागतात, अशी हाकाटी सुरु केली.
उमेदवार अंतिम करण्याच्या काळात; आपण बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देऊन टाकू असा प्रस्ताव राष्टÑवादीने काँग्रेसपुढे ठेवला होता. मात्र तो ही काँग्रेसने नाकारला. ती सल निकालानंतर काँग्रेस लेना बँक आहे, देना बँक नाही... अशा शब्दात
बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी बोलून दाखवली. जर बहुजन विकास आघाडीला दोन्ही काँग्रेसने पाठिंबा दिला असता तर काँग्रेसची ‘झाकली मुठ सव्वालाखाची’ राहीली असती. मात्र निवडणूक लढवून, आपल्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त होणे व पक्ष चौथ्या नंबरवर जाणे यामुळे प्रदेश काँग्रेसच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाने देशभरात भाजपाला जोरदार धक्का दिला. भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री व अन्य अनेक मंत्री विदर्भात आहेत, ज्या ठिकाणी संघाचे मुख्यालय आहे, त्या विदर्भात; भंडारा-गोंदियात भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव होत असताना काँग्रेसच्या ‘स्वमग्न’ नेत्यांनी मात्र हात दाखवून अवलक्षण करुन घेतले. एवढे चांगले वातावरण सरकारविरोधी असताना, पालघरमध्ये
आपल्याला यश मिळणार नाही हे कळत असतानाही आमच्या नेत्यांनी केलेल्या कृतीचा फटका राज्यभर बसू शकेल, याचेही भान आमच्या नेत्यांना राहीले नाही, अशा शब्दात
अनेकांनी भावनांना वाट करुन दिली.