काँग्रेस-भाजपा-काँग्रेस! प्रफुल्ल पाटलांना जिल्हाध्यक्षपद दिल्याने 300 हून अधिक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 07:39 PM2021-10-18T19:39:36+5:302021-10-18T19:39:53+5:30
जिल्हा परिषद पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात पुरती वाताहत झाल्यानंतर तात्काळ काँग्रेस श्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील ह्यांच्या जागी प्रफुल्ल पाटील ह्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र जिल्हा काँग्रेस कडे पाठवून दिले.
पालघर: लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अडचणी काळात काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रफुल्ल पाटील यांना पुन्हा पक्षात घेत पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष पद दिल्याच्या पार्श्वभूमीवर 300 च्यावर पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त होईल, असा इशारा जिल्हा काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
जिल्हा परिषद पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात पुरती वाताहत झाल्यानंतर तात्काळ काँग्रेस श्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील ह्यांच्या जागी प्रफुल्ल पाटील ह्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र जिल्हा काँग्रेस कडे पाठवून दिले. मात्र, ह्याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना देण्यात आली नसून काँग्रेसमध्ये नसलेल्या आणि काँग्रेस च्या पडत्या काळात काँग्रेस सोडून गेलेल्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष पद देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्याध्यक्ष पदाची निवड करताना पक्षाची ध्येय धोरणे व घटने नुसार जिल्हाचे नेते, पदाधिकारी, प्रमुख नेते ह्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे असताना आपल्याच पक्षातील काही विघ्न संतोषी लोकांच्या सांगण्यावरून निवड केल्याचे सांगून ही निवड प्रक्रियाच काँग्रेस घटनेच्या विरोधात असल्याचे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख ह्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात प्रवेश द्या मात्र जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊ नका, अशी मागणी आम्ही काँग्रेस अध्यक्षांकडे केल्याचे माजी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील ह्यांनी सांगितले.
विक्रमगड मधील एका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीत भाजप ला मदत व्हावी हा ह्या निवडी मागचा डाव असल्याचे ही पाटील ह्यांनी सांगितले ह्या निवडी विरोधात दिवाकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख, सचिव मनोज पाटील, खजिनदार चंद्रकांत पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष असिफ मेमन, रोशन पाटील, मनोहर दांडेकर आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ह्या निवडीचा पुनर्विचार न केल्यास 300 पदाधिकारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. या राजीनाम्याने पूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त होईल, असा दावा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.