पालघर : भाजपा प्रणित सरकारने एका वर्षापूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा देशाला आर्थिक संकटात ढकलणारा असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी करून त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याचा दावा केला. ते आज जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चा समोर बोलत होते.भाजप सरकारच्या नोटबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीचा दिन हापालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, प्रदेशचे दत्ता नर, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, नगरसेविका डॉ.उज्वला काळे आदींनी मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढविला. या रॅलीस २ वाजता चार रस्ता शिवाजी चौकामधून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत शेकडो गाड्या चा ताफा ह्या मोर्चात सहभागी झाला होता. सर्व मोर्चेकºयांनी हाताला काळी पट्टी बांधून भाजप सरकार विरोधात घोषणा दिल्या. नोटा बंदीच्या निर्णयानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी लावलेल्या रांगेत उभ्या असलेल्या १५० निरपराध लोकांचा मृत्यू झाला आहे. काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नोट बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असताना १६ हजार कोटी रुपये बँकाकडे परत येऊ शकलेले नाहीत. या नोटा बंदी मुळे दहशतवादी कारवाया थांबलेल्या नसून काश्मीर मध्ये आतापर्यंत ८० जवान तर ५१ निरपराध नागरिकांचे बळी गेल्याचे जिल्हाध्यक्ष केदार काळे ह्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
नोटाबंदी निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा, माजी राज्यमंत्री गावित यांच्यासह अनेकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:46 AM