पालघर : नगरपरिषदेच्या मोरेकुरण येथील डम्पिग ग्राउंडमुळे परिसरातील गाव पाड्यांत राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतांनाही या ग्राउंडभोवती संरक्षक भिंत बांधण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला. पालघर नगरपरिषदेने मोरेकुरण येथील महसूल विभागाची सर्व्हे नंबर १३१ मधील सुमारे पाच हेक्टर जागा आठ वर्षा पूर्वी डम्पिग ग्राउंडसाठी मिळवली होती. त्यात गांडूळ प्रकल्प खत प्रकल्प, बायोमिथेनेट प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने तज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात येईल असे ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला घेतांना नगरपरिषदेने लिहून दिले होते. मात्र नगरपरिषद प्रशासनाने आपला याबाबतचा शब्द न पाळल्याने मोरेकुरण ग्रामपंचायतीने नगरपरिषदेला पत्र लिहून आपण खतनिर्मिती प्रकल्प उभारीत नसल्यामुळे व साठविलेल्या कचरा पेटवला जात असल्याने निर्माण झालेल्या धुराने परिसरातील मोरेकुरण, विकासनगर ,खारलपाडा ई.भागातील नागरिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत. तर डास, माशांमुळे अन्य आजारांनाही आमंत्रण मिळत असल्याची तक्रार केली होती. मात्र तरीही या समस्येकडे पालघर नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याने या सर्व समस्यांनी अनेक वर्षापासून त्रस्त असलेल्या नागरिकानी २ नोव्हेंबर पासून कचऱ्याच्या गाड्या रोखून धरीत आंदोलन केले होते. नगर परिषदेच्या काही गाड्या डम्पिंग ग्राउंड भोवती भिंत बांधण्यासाठी वीट, रेती ई. सामग्री घेऊन आल्या असता ग्रामस्थांनी त्या रोखून धरल्या. त्यामुळे पालघर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी ग्रामस्थ, सरपंच कुंदा वरठा, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे,उपनगराध्यक्ष रईस खान,मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे ई. ची बैठक आयोजित केली होती. यावेळी कुठल्याही परिस्थितीत आमच्या आरोग्याशी खेळणारे डिम्पंग ग्राउंड आम्हाला नको आहे असे सांगितले.(वार्ताहर)
डम्पिंगच्या भिंतीची उभारणी रोखली
By admin | Published: November 15, 2016 4:13 AM