पालघर : पालघरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी सोलार बोटीची निर्मिती केली आहे. सौरऊर्जेवर चालणारी ही बोट पालघरमध्ये चर्चेचा विषय बनली असून भविष्यात या बोटीच्या निर्मितीचा फायदा होण्याचा विश्वास औद्योगिक संस्थेकडून व्यक्त केला जात आहे.
पालघर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी केलेल्या बोटीची निर्मिती एक आविष्कार ठरला आहे. ही बोट इंधनाची बचत करणारी असून भविष्यात या बोटीचा उपयोग जास्तीत जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या ८ ते ९ महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी भंगारातून एक जुनाट व्हॅन विकत घेऊन त्यात सकारात्मक बदल करीत आपल्या संकल्पनेनुसार सौरऊर्जेवर चालणारी बोट तयार करण्यात यश मिळविले आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीसाठी आवश्यक निधी आजी-माजी प्रशिक्षणकर्त्यांनी संस्थेचे प्राचार्य एस. एन. परदेशी, निर्देशक जे. आर. पाटील, डी. आर. भारमल, के.बी. आहेर, केतन किणी यांनी उभा केला.