तलासरी : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुके गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून सारखे भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. गुरुवारी ३० मे रोजी पहाटे ५.२० ला भूकंपाच्या ३.० रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरली. त्यानंतर सकाळी ९.०३ वाजेता २.२ तर १०.५९ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा धक्के बसल्याची नोंद झाली आहे. तसेच शुक्रवार सकाळीही जोरदार भूकंपाचे पाठोपाठ धक्के बसले. प्रत्येक आठवड्याला असे तीन ते चार धक्के सौम्य व मध्यम स्वरूपाचे बसत असल्याने जिल्ह्यावरील भूकंपाचे सावट अद्यापही संपलेले नाही. अधून मधून बसणाऱ्या जोरदार भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमधील भीतीचे वातावरण कायम आहे.
भारतीय हवामान विभागाच्या संकेत स्थळावर ५.२० मिनिटाच्या ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून इतर नोंदी गुजरात सेस्मॉलॉस्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संकेत स्थळावर नोंदविण्यात आल्या आहेत. डहाणू आणि तलासरी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासून भूकंपाचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत ४.३ आणि ४.४ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाच्या सर्वाधिक नोंदी नोंदविण्यात आल्या आहेत. तरी आतापर्यंत शेकडो मध्यम व सौम्य स्वरूपाच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. डहाणू आणि तलासरी परिसरात हवामान विभाग दिल्ली यांच्यामार्फत ३ आणि हैद्राबाद सेस्मॉलॉजिस्ट रिसर्च सेंटर मार्फत ६ अशी ९ भूकंप मापक यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून नोंदीच्या आधारे भूगर्भीय हालचालींचे विश्लेषण करण्यात येत आहे. परंतु भूगर्भीय हालचालींचा नोंदी करणाºया तज्ञांना अद्यापही भूकंपाचा केंद्र बिंदू मिळू शकलेला नाही. तज्ज्ञांच्या मते भूकंपाचा केंद्र बिंदू नेहमी बदलत असतो.
प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांमध्ये जागृती व करावयाच्या सुरक्षेच्या उपाय यांची जनजागृती केली आहे. परंतु वारंवार भूकंपाचे धक्के बसूनही शासकीय यंत्रणा ढिम्मच असल्याचे जाणवत आहे. कारण वेळोवेळी होणाºया भूकंपाच्या नोंदीही संकेत स्थळावर नोंदविण्यात येत नसल्याने सेस्मॉमीटरमधील डेटा घेण्यात येतो की नाही, असा संशयही नागरिकात व्यक्त होत आहे.
प्रशासनाची उदासीनताया भूकंपाच्या धक्यांबाबत प्रशासक नेहमीच उदासीनता दाखवत आले आहे. त्यामुळे योग्य ती माहिती तत्परतेन न देण्यापासून ते चुकीची माहिती देणे, माहिती दडवून ठेवने असे प्रकार प्रशासनाकडून नेहमीच घडत आलेले आहेत. भूकंप मापक यंत्रांची देखभाल आणि परिचलन याकडेही त्याचे लक्ष नसते. हे काम म्हणजे आपल्यावर येऊन पडलेली नसती आफत आहे. असा त्याचा नूर असतो.