पालघर : संपूर्ण जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिवस पारंपरिक वेशभूषेत आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो आहे. असे असताना यावेळी तरुणांनी आपल्या पारंपरिक तारपा नृत्यावर ठेका धरण्याऐवजी डीजे आणि बेंजोच्या तालावर ठेका धरल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पहावयास मिळाले.संयुक्त राष्ट्र संघाने ९ आॅगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला आहे. आदिवासी एकता परिषदेच्यावतीने पालघरच्या शिवाजी चौकातून आर्यन ग्राऊंडपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पूर्ण जिल्ह्यातून हजारो आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी एकता परिषदेचे अध्यक्ष काळू राम धोदडे, विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. विश्वास वळवी, कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी आदी मान्यवर उपस्थित होते.पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून इथली आदिवासी भाषिक वैविध्य वारली, कोकणा, धोडी आदी भाषा हळुहळू संपत जातील की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाषा बोलणारी माणसे संपली तर भाषा टिकणार कशी? त्यांचे तारपा, कांबळी, गौरी, सांगड, ढोल नाच, टिपली नाच, हे नाच टिकणार कसे? अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. अनेक दशकांपासून हा आदिवासी समाज भूमी अधिकार, कुपोषण, रोगराई, बेरोजगारी, शैक्षणिक अन्याय, या विरोधात लढत असताना काही वर्षांपासून आदिवासी समाज मुळापासून बेदखल करण्याचे काम राज्यकर्ते करत असल्याचा आरोप यावेळी अनेक आदिवासी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून केला. जिल्ह्यात दिल्ली - मुंबई औद्योगिक कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, एमएमआरडीए विस्तारीकरण, फ्रेंड कॉरिडोर, औद्योगिक वसाहती आदी प्रकल्प योजनांमुळे इथला आदिवासी भूमिपुत्र आपल्या जंगलापासून आपल्या जमिनीपासून वेगाने बेदखल होत आहे. याबद्दलही काळजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या विरोधात आपली एकजूट दाखवीत शासनाला जणू इशाराच दिला.शिवाजी चौकाजवळ उपस्थित तरुणांनी बिरसा मुंडा या तरु ण क्रांतीकारकांच्या पेहरावात तर तरुणींनी आपल्या पारंपरिक लुगड्याच्या पेहरावात फेर धरून ठेका धरला होता. आज आनंदाचा दिन साजरा होत असताना ही तरुणाई आपल्या तारपा या पारंपरिक वाद्यांवर ठेका धरण्याऐवजी डीजेच्या गाण्यावर नाचत असल्याचे पाहावयास मिळाले. दुसरीकडे पंचायत समितीच्या समोर श्रमजीवी संघटनेकडून आदिवासी दिन साजरा केला जात असताना त्यांनीही बेंजोच्या तालावर ठेका धरल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली.एकता परिषदेने शासनापुढे आपल्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र शासन पातळीवरून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आपली एकजूट व ताकद दाखवित आपला हक्क मिळविण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो.- डॉ. विश्वास वळवी, संस्थापक विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट
आदिवासी दिनी बेंजोच्या तालावर ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:25 PM