रवींद्र सोनावळे
शेणवा : कोरोनामुळे ग्रामीण भागातील अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणारे कारागीर आणि कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक व्यवसाय म्हणून तयार केलेले मातीचे माठ विक्रीअभावी घरातच पडून राहिल्याने या कुंभार समाजावर आर्थिक संकट ओढवले आहे.
शहापूर तालुक्यातील अस्नोली, अल्यानी, चेरवली, बोंद्रेपाडा, सावरपाडा, बिरवाडी, लाहे, शेई येथील कुंभार समाज गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणारा मातीचे माठ तयार करतात. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मातीचा माठ तयार करण्यासाठी माती, जळाऊ लाकडे, शेण, लीद, आदी सामग्री लागते. त्यासाठी खर्चही आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे वर्षभरातील चारच महिने चालणारा हा व्यवसाय असून, एक कारागीर रोज दहा ते पंधरा माठ तयार करतो व लहानमोठ्या आकारानुसार दर ठरवून माठांची विक्री दारात येणाऱ्या स्थानिक किरकोळ ग्राहक किंवा घाऊक व्यापाऱ्यांद्वारे करतात. उन्हाळ्यात माठाला कल्याण, ठाणे, डोंबिवली व इतर शहरांतून मागणी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे किरकोळ ग्राहक किंवा घाऊक व्यापारी फिरकत नसल्याने माठ विक्रीअभावी दारातच पडून आहे. पावसाळ्यात हे माठ ठेवायचे कुठे या समस्येने व्यावसायिक ग्रासले आहेत. माठांच्या विक्रीअभावी आर्थिक समस्या भेडसावणाऱ्या कुंभार समाजासमोर व्यापाऱ्यांकडून आगाऊ घेतलेली रक्कम फेडायची कशी, पावसाळ्यात खाणार काय, कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार कसा, असे प्रश्न उभे ठाकले आहेत.
माठांची विक्री झाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुंभार बांधवांना आर्थिक मदत म्हणून अनुदान मिळावे अशी सरकारकडे मागणी केली आहे. - संदीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष, कुंभार समाज
कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या समाज बांधवांना अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी करणार आहे. - कृष्णा सोनावळे, माजी जिल्हाध्यक्ष, कुंभार समाजविक्रीअभावी तयार माठ दारातच पडून असल्याने आर्थिक समस्येने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची गंभीर समस्या उद्भवली आहे. - बबन सोमवते, कारागीर, सावरपाडा