पारोळ : कोरोना व्हायरसमुळे वसई, विरार, नालासोपारा या भागातील गर्दीला आळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व तालुक्यातील आठवडे बाजार बंद केल्यामुळे आपण पिकवलेला भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने आता पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणेच भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आल्याने आता कोरोनाचा फटका बळीराजा ही बसला आहे.वसई तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात फूलशेती होत असल्याने आणि कोरोनामुळे दादर येथील फूल बाजारही बंद केल्याने फूल शेतकरी अडचणीत सापडला असून फूल नाशिवंत असल्याने त्यांचे करायचे काय प्रश्न फूल शेतक-यांपुढे आहे. तालुक्यात पावसाळी भातशेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिर्ची, कारली, वांगी, काकडी, पीक शेतकरी घेतात जर भाजीला भाव चांगला असेल तर फायदा शेतक-यांना होतो. पण या वर्षी भात शेती वाया गेल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली. बी बियाणे, खते, औषधे व मजुरी महाग व या वर्षी ढगाळ हवामान यामुळे शेतीच्या खर्चात वाढ झाली. गेल्या वर्षी टोमॅटो या पिकाला भाव चांगला मिळाल्याने शेतक-यांना फायदा झाल्याने, आडणे, भाताणे, उसगाव, शिरवली, कळभोंण इ. गावात टोमॅटो व इतर भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. पण आडणे गावात रोज दहा हजार किलोच्या वर रोज टोमॅटो निघतो, पण या वर्षी टोमॅटो पीक तयार होताच कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव झाल्याने परदेशात जाणारा माल बंद करण्यात आला. त्यामुळे टोमॅटो दर कमी झाला. तरी पण स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असल्याने कमी दराने पण भाजी पीक विकले जात होते. आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व आठवडे बाजार बंद केल्याने आता हातात आलेल्या भाजी पिकांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्यासमोर आहे.टोमॅटो पीक तयार झाले असून मागील वर्षी २५ किलोला ५०० रुपयांच्या वर दर होता. पण या वर्षी दर कमी असतानाही टोमॅटोला कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने या मालाचे करायचे काय?- उमेश पाटील, शेतकरी, आडणेफूल बाजार बंद असल्याने राहिलेल्या फुलांचा कोणताही उपयोग होत नसल्याने फूल शेतकºयांचे मोठे नुकसान होते, असे असतानाही या भागातील शेतकरी आत्महत्यासारखे पाऊल उचलत नसून कोरोनापासून लढण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत आहोत.- सुभाष भट्टे, फूल शेतकरी, वसइ
शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका, भाजीपाल्याचे भाव गडगडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 1:31 AM