- हुसेन मेमन
जव्हार - जव्हार नगर परिषद कार्यालयात 2 रुग्ण तर तहसील कार्यालयाचा 1 शिपाई पॉझिटिव्ह आढळल्यामुळे कोरोनाचा शिरकाव आता शासकीय कार्यालयात झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
खाजगी दवाखान्यापासून सुरवात झालेल्या रुग्णांच्या संपर्कातून इतर संपर्क असा मोठा आकडा वाढत जात असून, सोमवारी नवीन 5 रुग्णांची भर झाली असून, आतपर्यंत 51 रुग्णांची नोंद जव्हार तालुक्यात करण्यात आली आहे.
नगर परिषदेचे पाहिले अधिकारी हे पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब घेऊन क्वारंटाइन करण्यात आले होते, तसेच कार्यलयातही औषध फवारणी करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, जे लोक कोरोना योद्धा म्हणून काम करीत होते, त्यांना आता होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला शिपाई पॉझिटिव्ह आल्यामुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे, अधिकारी वर्गाला क्वारंटाइन व्हावे लागते की काय, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. जे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत, त्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे.