वसई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण असलेल्या ‘अक्षयतृतीया’ या सणाला लोक नवीन वास्तू, वाहन, जमीन खरेदी आणि खासकरून या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर करीत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे आधी गुढीपाडवा कोरडा गेला व आता अक्षयतृतीयेचाही मुहूर्त हुकला आहे. वसई तालुक्यात सराफा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला असून आमचे व कामगारांचे कंबरडे मोडले आहे, अशी माहिती सराफा व्यापारी, वसई नवघर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरूभाई जैन यांनी ‘लोकमत’ला दिली.वीरूभाई यांनी सांगितले की, या आधी तीन वर्षांपूर्वी सलग दोन महिने आम्ही व्हॅटसाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. त्या वेळी हजारो कोटीचे नुकसान सहन करून सरकारने आपलेही नुकसान केले होते. त्यांनतर जीएसटीनंतर नोटबंदी आणि आता कोरोनाचे संकट. यामुळे वसईतील सोनार व त्यांची बाजारपेठ ठप्प आहे. वसई, नवघर, वालिव, सातिवली पूर्व भाग मिळून ११० दुकाने आणि त्यात ३५० हून अधिक कर्मचारी होते ते गावी गेले आहेत. सण आला की, मोठी दुकाने दहा ते बारा लाखाचा धंदा करतात, तर छोटी व सामान्य दुकाने व्यापारी २५ हजार ते लाखभर रुपयांचा धंदा करतात. मात्र आज कोट्यवधींची उलाढाल होणारा सोन्याचा व्यापार ठप्प आहे, असे ते म्हणाले.
कोरोनामुळे अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 1:00 AM