- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पेन्स सहयोग फाउंडेशनतर्फे तालुक्यातील शंकर पाडा, टोकेपाडा आणि गोवणे या तीन जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी घरटी तयार केली. त्यावर कोरोना जनजागृती विषयक संदेश लिहून त्यापैकी काही शाळेच्या आवारात तर काही परिसरातील ग्रामस्थांना वाटण्यात आली.पूर्वी लाकडाची, कौलाची घरे असत, झाडे, जंगले विपूल प्रमाणात होती. त्यामुळे पक्ष्यांना निवाऱ्यासाठी भरपूर जागा होती. मात्र, आधुनिकीकरणाच्या नावाखाली सिमेंटची घरे, डांबरी रस्ते आणि माणसाने केलेली प्रचंड वृक्षतोड यामुळे पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होत आहे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शाळांच्या माध्यमातून पक्ष्यांना मानवनिर्मित घरटी बांधून देत त्यांचे संवर्धन करण्याची योजना पेन्स सहयोग फाउंडेशनने आखली; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दक्षता म्हणून शासनाने विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, शिक्षकांनी शालेय परिसरात कोरोनाविषयक जनजागृती करावी, असे वरिष्ठांचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे जि.प. शिक्षक, कर्मचारी हे काम करत आहेत. या पक्ष्यांचे साप, मांजर यापासून संरक्षण व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांना घरटे दत्तक देण्यात आले.मानवनिर्मित घरट्यात चार ते पाच चिमण्यांची सोय२० मार्च चिमणी दिनानिमित्त जि.प. शाळा शंकरपाडा, टोकेपाडा, गोवणे शाळेत चिऊताईसाठी संरक्षक घरटे तयार करण्यात आले. त्यावर कोरोनाशी संबंधित जनजागृतीच्या घोषणा लिहून ती परिसरातील गावकऱ्यांना भेट देण्यात आली. प्लायवूड मटेरियल आणि कागदी जाड पुठ्ठ्यापासून ही घरटी तयार करण्यात आली असून, त्यामध्ये किमान चार ते पाच चिमण्या राहू शकतील अशी रचना करण्यात आली आहे. पक्ष्यांना उबदार आणि आरामदायी वाटावे यासाठी गवत, पाण्याची वाटीही ठेवण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी, घरासमोरील झाडांवर ही घरटी ठेवण्यात आली आहेत.
चिमणीच्या घरट्यावर कोरोना जनजागृती संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:46 AM