- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांतील लसीचा साठा संपल्याने अखेर २३ लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. अजूनही लसीचा साठा मिळण्याबाबत कुठलेही संकेत मिळत नसल्याने जिल्ह्यात लसीकरण प्रक्रिया पूर्ण बंद पडण्याची परिस्थिती ओढवली आहे. याची गंभीर दखल केंद्रातून आलेल्या समितीने घेऊन तात्काळ लसपुरवठ्याबाबत पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. केंद्राकडून पुरेसा लसीचा साठा राज्याला मिळत नसल्याने लसीकरण मोहीम नाईलाजाने स्थगित करण्याची पाळी ओढवू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत उभे आहेत. कोरोनाला प्रतिबंध करणारी ही लस असल्याने लसीकरणाला वेग आला असताना अचानक केंद्र सरकारकडून लस मिळण्याच्या मागणीची पूर्तता केली जात नसल्याचे आरोप केले जात आहेत. आरोग्य संचालनालय, पुणे यांच्याकडे जिल्ह्यातून ८५ हजार लसीची मागणी करण्यात आली असून त्यांच्याकडून ठाणे आरोग्य विभागाकडे येऊन नंतर पालघर जिल्ह्याला साठा मिळणार आहे.१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिला डोस घेतल्यावर ४ आठवडे ते ६ आठवड्यात दुसरा डोस घेणे क्रमप्राप्त होते. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात घेतलेल्या पहिल्या लसीच्या डोसनंतर दुसरा डोस एप्रिलच्या १० तारखेपर्यंत घेणे अपेक्षित असताना आता लसीचा साठा संपल्याने शरीरातील प्रतिकारक्षमता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला धोका निर्माण होण्याची भीती असल्याचे एका डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता : बाधितांची संख्या ६ हजार ९२१जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ९२१ इतकी झाली आहे. बाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी हॉस्पिटलमधील बेडची संख्या कमी पडत आहे. विक्रमगडमधील रिव्हेरा या कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठ्याच्या तक्रारीत अजूनही सुधारणा झाली नसल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. या हॉस्पिटलमधील मोठे सिलेंडर ८ दिवसापासून संपले असून छोट्या सिलेंडरवर ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.बंद पडलेली केंद्रेवाडा ग्रामीण रुग्णालय, कासा उपजिल्हा रुग्णालय, भाताने, पारोळ, साखरशेत, निर्मळ, सातपाटी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वेदांत हॉस्पिटल, लालबहादूर शास्त्री हॉल मनोर, वाणगाव ग्रामीण रुग्णालय, टॅप्स हॉस्पिटल, साईनित, चिन्मया हॉस्पिटल बोईसर, डॉ.ढवळे हॉस्पिटल पालघर, गुरुकृपा हॉस्पिटल वाडा तर वसई-विरार महापालिका अंतर्गत रिद्धी विनायक हॉस्पिटल, विजयालक्ष्मी हॉस्पिटल, बदर हॉस्पिटल नालासोपारा, कार्डिनल ग्रेशिअस हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल वसई, विजय वल्लभ हॉस्पिटल बोलींज, जीवदानी हॉस्पिटल, विरार(पूर्व), संजीवनी हॉस्पिटल विरार(प) आदी २३ हॉस्पिटलमधील लसीकरण साठा संपल्याने लसीकरण बंद करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.
Corona Vaccination: जिल्ह्यातील 23 लसीकरण केंद्रे बंद; पालघरमधील लसीचा साठा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:03 AM