पालघर : पालघर जिल्ह्यात आजवर ३ लाख ५९ हजार ९६६ जणांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा मागणी होत आहे. जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये २८ हजार ०३५, जव्हार ९ हजार ८१९, मोखाडा ३ हजार ४२९, पालघर ९० हजार ५५६, तलासरी ४ हजार ६०९, वसई ग्रामीण २३ हजार ९७९, विक्रमगड ७ हजार ४०, वाडा २१ हजार ८८०, तर वसई-विरार १ लाख ७० हजार ६१९ जणांचे लसीकरण झालेले आहे.वसई-विरारसह पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त असून आजवर झालेले हे लसीकरण खूपच कमी आहे. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक लसीकरण वसई-विरारमध्ये झालेले आहे, परंतु महापालिका क्षेत्रातील लोकसंख्याही मोठी असल्याने लसीकरणाची टक्केवारी खूपच कमी असल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात वसई-विरारनंतर पालघर तालुक्यात रुग्णसंख्या जास्त आढळलेली आहे. आता कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात आरोग्य यंत्रणा कमालीची यशस्वी ठरत असताना त्याच वेळी होत असलेल्या लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण झालेले चार तालुके असून जव्हार, मोखाडा, तलासरी आणि विक्रमगड या चार तालुक्यांनी १० हजारचाही टप्पा ओलांडलेला नाही. मध्यंतरी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अफवा पसरल्याचेही बोलले जात होते. त्यामुळेही जव्हार, मोखाडा, तलासरी आणि विक्रमगड या तालुक्यांतील ग्रामीण भागात लसीकरण कमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पालघर जिल्ह्यामध्ये आजवर आरोग्य विभागातील २६ हजार ३९४ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस, तर १७ हजार ३१६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.फ्रंटलाईन वर्करपैकी २८ हजार ४८५ जणांनी पहिला डोस, तर ११ हजार ५९७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४५ वयोगटातील १८ हजार २१७ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील १ लाख २७ हजार ५९१ जणांनी पहिला डोस आणि ९ हजार १२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील ९४ हजार ६७० जणांनी पहिला डास तर २६ हजार ६८४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
Corona Vaccination : पालघर जिल्ह्यात फक्त 3,59,966 लसीकरण; सर्वाधिक वसई-विरारमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 9:29 AM