पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये तसेच संबंधितांवर तत्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याची घोषणा केली आहे.
पालघर जिल्हा मुंबई शहराजवळ असल्यामुळे अनेक पर्यटक पालघर जिल्ह्यामार्गे प्रवास करतात अथवा वास्तव्यास असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे जाहीर केले आहे.
या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून दैनंदिन अहवाल सादर करावयाचा आहे.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे. तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे इत्यादी कामे युद्ध पातळीवर केली जाणार आहे.पर्यटन स्थळे पडली ओस : हॉटेल, रिसॉर्टचा व्यवसाय ठप्पजिल्ह्यातील पर्यटन स्थळे ओस पडली असून हॉटेल्स, रिसॉर्टचा व्यवसाय ठप्प झाला आहे. जिल्ह्यातील थ्री स्टार हॉटेल्समध्ये परदेशी पर्यटकांची नोंदणी नाकारण्यात येत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. पर्यटन व्यवसाय एकीकडे धोक्यात आला असताना कोरोनाच्या धसक्याने पर्यटन, पोल्ट्री, मटण व्यावसायिकांचे कंबरडेही मोडले आहे. त्यामुळे कोरोनाची दाहकता कधी संपणार असा प्रश्न केला जात आहे. आधीच बाजारपेठेत असलेली मंदी संपते न संपते तोच कोरोनाच्या या कहरामुळे मोठ्या आर्थिक मंदीला लोकांना सामोरे जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट संपणार कधी? या प्रतीक्षेत लोक आहेत.घाबरू नका, पण सतर्कराहा : सद्यस्थितीत शहर-जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल, अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रूप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या, घाबरू नका पण सतर्क रहा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.