मुंबई - कोरोनाचं संकट कमी झालं असले तरी अद्यापही कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळेच, अद्यापही कोविड सेंटर आणि कोरोना डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये रुणांवर उपचार होत आहेत. येथील रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधामध्ये जेवणाचीही सोय आहे. त्यानुसार, संबंधित कोविड सेंटरचा ठेका ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र, पालघरमधील एका कोविड सेंटरमध्ये पुरविण्यात येत असलेल्या जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. याबाबत, आमदार निरंजन डावखरेंनी ट्विट करुन माहिती दिली.
कोविड सेंटरमधील जेवणात आढळलेल्या अळ्या म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड रिवेरा डेडिकेटेट कोविड सेंटरमध्ये सलग दोन दिवस डाएट चिकनमध्ये अळ्या आढळल्या आहेत. याबाबत, रुग्णांनी तक्रार केल्यावर ठेकेदार शिवसेनेच्या नावाने धमक्या देतोयं. गरीब रुग्णांना वाली कोण? जिल्हाधिकारी लक्ष देतील का?, असा सवाल आमदार डावखरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचे मोठे हाल आणि गैरसोय झाली आहे. ऑक्सीजनचा अभाव, इंजेक्शनची कमतरता आणि बेडही उपलब्ध नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्यातच, कोविड सेंटरमध्ये पुरविण्यात येणाऱ्या जेवणाबद्दलही अनेक ठिकाणी तक्रारी आल्या होत्या. आता, पालघरमधील विक्रमगड येथील रिवेरा कोविडे सेंटरमध्ये पुन्हा तोच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपा नेते आमदार निरंजन डावखरेंनी या जेवणाच्या पॅकेटचे फोटोही शेअर केले आहेत.