विरार : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घबराट निर्माण झालेली असतानाच आजवर या जीवघेण्या आजारातून १० हजार ४७९ रुग्णांनी मात करण्यात यश मिळवले आहे. एकूण रुग्णबाधितांची संख्या १३ हजार ६७७ झालेली असताना घरी परतलेल्यांचे प्रमाण दिलासादायक ठरले आहे. दरम्यान, केवळ दोन हजार ९०९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये मध्यंतरीच्या काळात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले होते. दिवसभरात ज्या संख्येने रुग्ण आढळत होते, ते पाहता पालिका हद्दीतील शहरांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अद्यापही लोकांमध्ये ही भीती कायम आहे, मात्र तरीही अलीकडच्या काळात पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने ज्या पद्धतीने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. त्याचीच प्रचीती म्हणून सध्या पालिका हद्दीतील साडेदहा हजारहून जास्त रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहेत.वसई, नालासोपारा आणि विरार तसेच नवघर-माणिकपूर या शहरांमधील बहुसंख्य नागरिक रोजीरोटीसाठी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी जात असतात. वसईत पहिला रुग्ण जरी परदेशातून आलेला आढळला होता, तरी पुढील काळात नालासोपारा, विरार तसेच वसई भागात आढळलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबई-ठाण्यात नोकरीधंद्यानिमित्त आलेले असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पुढे त्या त्या रुग्णांच्या कुटुंबातील आणि संपर्कातील अन्य लोकांनाही कोरोनाबाधा झाल्याने महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला होता, मात्र आता महापालिकेने रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करीत प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आलेले आहे. त्यामुळेच बरे होणाऱ्यांच्या मोठ्या संख्येबरोबरच उपचार घेणाºयांची घटलेली संख्याही चिंता कमी करणारी आहे.वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये एकूण रुग्णबाधितांची संख्या १३,६७७ झालेली असताना घरी परतलेल्यांचे प्रमाण दिलासादायक ठरले आहे.दरम्यान, केवळ २,९०९ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
CoronaVirus News: वसईत १० हजार ४७९ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:59 AM