वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून शनिवारी एका दिवसात १५ रुग्णांची यात भर पडली आहे तर ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.जूचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्रातील दोन नर्स व दोन वार्डबॉय, एक आया यांच्यासह सात रुग्ण व एका अवघ्या चार दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने पालिकेच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.वसई पश्चिमेकडील ६० वर्षीय महिला भाबोळा येथील रुग्णालयात उपचार घेत होती. उपचारादरम्यान तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. शनिवारी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दुसरीकडे वसई-विरार महापालिकेच्याच सर डी.एम. पेटिट रुग्णालयातील नर्स व वॉर्डबॉय हे कोरोनाबाधित आढळून आल्याने हे रुग्णालय पालिकेने मंगळवारी सील केले होते. तर शनिवारी जूचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्रात नर्स, इतर कर्मचारी, रुग्ण व एक चार दिवसांचे बाळ असे एकूण १५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यात नालासोपारा पूर्वेतील २० वर्षीय तरुण हा ‘सारी’ने बाधित आहे.
CoronaVirus: वसई-विरारमध्ये नवीन १५ रुग्ण; अवघ्या चार दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 1:00 AM