नालासोपारा : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलेले असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवा देणारेच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. डॉक्टर, वार्डबॉय, नर्स, कर्मचारी, आया, क्लार्क, एक्सरे व डायलिसीस टेक्निशियन असे कोरोनाशी लढा देऊन नागरिकांना आरोग्य सेवा देणारे ‘देवदूत’ या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. यात वसई-विरारमध्ये राहणाऱ्या १७ नर्सचा समावेश आहे.वसई तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपैकी ५० टक्के रुग्ण हे मुंबईत अनेक ठिकाणी अतिआवश्यक सेवा देणारे आहेत. वसई तालुक्यात सोमवारपर्यंत २२३ रुग्ण सापडले असून त्यात आरोग्यसेवा देणारे सुरक्षारक्षक -२, वाडबॉय - ६, कर्मचारी - १२, एक्सरे आणि डायलिसिस टेक्निशियन - ४, आया - २, फार्मासिस्ट - १, प्रशिक्षणार्थी डॉक्टर - १, वॉर्ड अटेंडेट - १, डॉक्टर - ३, क्लार्क - १ आणि नर्स १७ असे एकूण अंदाजे ५१ वसईत राहणारे ‘देवदूत’ कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.सोमवारी आरोग्य सेवेतील १२ रुग्णांनी या आजारावर मात केल्यावर त्यांना घरी सोडून देण्यात आलेले आहे. वसई तालुक्यात सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमुळे ही संख्या दोनशेच्या पार गेल्याचे वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. ५० टक्के रुग्ण मुंबईमुळे वसई तालुक्यात वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
coronavirus: वसई-विरारमध्ये १७ नर्स कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 2:17 AM