पालघर : तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या सातपाटी गावात मुंबईतून आलेल्या एका व्यक्तीच्या संपर्काने सुरू झालेली कोरोनाबाधितांची साखळी आता २९ वर पोचल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण सातपाटी गाव व पाडे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
सातपाटी हे गाव मासेमारीसाठी प्रसिद्ध असून या गावात मासे खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होत असते. या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून खरेदीदार येत असतात. या बाहेरून येणाºया व्यक्तींद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून गावातील शिवछत्रपती सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक मंडळ, ग्रामपंचायत व काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गावाच्या सीमेवर २३ मार्चपासून एक व्यवस्था निर्माण करून बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेशबंदी केली होती. येणाºया-जाणाºया प्रत्येक व्यक्तीची नोंद करून सॅनिटायझरची व्यवस्था करून दिवस-रात्र पहारा ठेवण्यात येत होता. यामुळे मागील तीन महिन्यांपासून गावात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता.
नोकरीनिमित्त मुंबईच्या खासगी रुग्णालयात जाणारा एक तरुण मागच्या आठवड्यात सातपाटी येथे आल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्याच्या सहवासात असलेल्या जवळच्या ११ नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर सुरू झालेली साखळी सध्या वाढू लागली असून ती २९ वर पोचल्याने तहसीलदार सुनील शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे, सरपंच अरविंद पाटील, उपसरपंच वैभव पाटील, ग्रामसेवक खेडकर आदींनी ग्रामस्थांशी चर्चा करून कोरोनाची वाढती साखळी रोखण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली.जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या अहवालानुसार सातपाटी येथे २९ कोरोनाबाधितांची असलेली संख्या पुढे वाढण्याची शक्यता व्यक्त केल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन नियमाद्वारे दिलेल्या अधिकाराचा वापर करून सातपाटी ग्रामपंचायतअंतर्गत सर्व गाव व पाडे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.