पालघर/विरार : पालघर जिल्ह्यात ४ हजार २४५ कोरोनाबाधित तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला असून ही साखळी वाढतच चालली आहे. त्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये रविवार-पर्यंतच्या आकडेवारीनुसार पालघर तालुक्यामध्ये २९०, डहाणू ९३, तलासरी १३, जव्हार १०१, मोखाडा २२, वसई ग्रामीण १६५, विक्रमगड ९९, वाडा २१५, तर वसई-विरारमध्ये सर्वाधिक ३५५० एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.वसई-विरार महापालिका क्षेत्रात वाढत असलेलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने तर नागरिकांच्या मनात भीतीची दाट छाया पसरलेली आहे. तीन हजारचा टप्पा पार करून आता वेगाने येथे बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत साडेतीनशे, अडीचशेच्या संख्येने येथे रुग्ण बाधित आढळून येत आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रात या जीवघेण्या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही शंभरपेक्षा जास्त झालेली आहे, मात्र त्याच वेळी आनंदाची बाब म्हणजे ५० टक्केपेक्षा जास्त रुग्णांनी या जीवघेण्या आजावर मातही केलेली आहे.
याचबरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. एकट्या पालघर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी अडीचशेचा टप्पा पार केला आहे. वाडासारख्या भागातीलही दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याच वेळी वसई ग्रामीण भागामध्ये जवळपास दीडशे कोरोनाधित आढळून आले आहेत. विक्रमगडसारख्या भागातही बाधितांचा आकडा शतकानजीक पोहोचला आहे.मच्छीमारांची कामे खोळंबली१ जून ते ३१ जुलै असा पावसाळी मासेमारी बंद कालावधी असल्याने सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत. या कालावधीत मच्छीमार इंजीन दुरुस्ती, जाळी दुरुस्ती, बोटीची डागडुजी, रंगरंगोटी अशा कामांत व्यग्र असतो.२७ जूनपासून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याने मच्छीमारांची सर्व कामे खोळंबली आहेत. या बंदचा कुठलाही कालावधी घोषित करण्यात न आल्याने रुग्णसंख्येची साखळी वाढल्यास तो १४ किंवा २८ दिवसांपर्यंत वाढू शकतो.३१ जुलैनंतर मासेमारीस सुरुवात होणार असल्याने उर्वरित एक महिन्यात मासेमारीची सर्व तयारी करण्याचे शिवधनुष्यपेलावे लागणार आहे.