हितेन नाईक
पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि वसई असे एकूण ८ तालुके आहेत. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात ५, ५२४ स्थलांतरित मजूर अडकल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण १८ क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्यात आले. यात पालघरमध्ये तीन, जव्हारमध्ये चार, मोखाडा येथे दोन, विक्रमगडमध्ये चार, वाडा येथे दोन, तलासरीत एक, तर डहाणूमध्ये दोन कक्षांचा समावेश आहे.
परराज्यांतील हे मजूर जिल्ह्यात अडकल्यामुळे या मजुरांना धान्य वाटप व भोजन व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाबरोबरच या मजुरांना सामाजिक संस्थांकडूनही धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. शासन पातळीवरून रेशनकार्डद्वारे धान्य वाटप रेशनकार्डधारकांना केले जात आहे, मजुरांना नाही, अशी माहिती देण्यात आली. शासकीय यंत्रणांकडून काय व्यवस्था केली गेली, त्याचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील ५५२४ मजुरांसाठी ४४ निवारागृहे उभारण्यात आली होती. यातील नऊ निवारागृहे शासनामार्फत चालवली जात असून औद्योगिक आस्थापनांमार्फत २७, वाडा येथे एक सामाजिक संस्थेमार्फत, वसई-विरार महानगरपालिकेमार्फत सात ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या निवारा केंद्रांतून सकाळी चहा-नाश्ता आणि दोन वेळचे जेवण, पिण्याचे पाणी, फर्स्ट एड पाउच दिले जातात.
जिल्ह्यातील पालघर, जव्हार, तलासरी, डहाणू, विक्रमगड, वाडा, मोखाडा या तालुक्यांत फिव्हर क्लिनिकची उभारणी करण्यात आली असून आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांमार्फत सेवा केली जात आहे. पालघरच्या न्यूयॉन फाउंडेशनच्या वतीने प्रवीण जैन आणि त्यांचे भाऊ, अधिकारी, कर्मचारी अशी मोठी टीम लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील आदिवासीबहुल ग्रामीण भागातील पाड्यापाड्यांत स्थलांतरित मजूर राहणाऱ्या भागात जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पौष्टिक आहार, पिण्याचे शुद्ध पाणी आदी सेवा आजही पुरवीत आहेत. या दरम्यान कुठलीही शासकीय मदत घेतली जात नाही.
दुसरीकडे सातपाटीसारख्या गावात सातपाटी इलेव्हन या क्रिकेटपटू असलेल्या युवकांनी कुठल्याही शासकीय मदतीविना लोकसहभागातून उभ्या केलेल्या अन्नदानाच्या चळवळीद्वारे ३० मार्चपासून गरीब, दुर्लक्षित मजूर यांना दोन वेळच्या जेवणाची विनामूल्य सेवा सुरू केली आहे. सातपाटी इलेव्हन क्रिकेट संघाने आजपर्यंत एकूण ३५ हजार ५०९ जणांना जेवण दिले आहे. लोकांना विनामूल्य जेवण घरपोच वाटप केले जात असून हे जेवण ही मुले स्वत: शिजवून देत आहेत. बोईसरमधील शिवसेना व पंचतत्व सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ, वैभव संखे हे २६ मार्चपासून दररोज अवध नगर, संजयनगर, सरावली भागात ३ हजार ८०० लोकांना विनामूल्य जेवण कुठल्याही शासकीय मदतीविना पुरवीत आहेत.