पालघर : नांदगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जमावबंदी कायदा मोडून होळी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्टवर धडक मारून रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या वेळी ४९ पर्यटकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.पालघर तालुक्यात १७ ते २७ मार्च या अवघ्या १२ दिवसांत ६८७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पालघर नगरपालिका क्षेत्रासह बोईसरमधील ६ गावे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आल्याने रविवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे हे बोईसर भागाची पाहणी करीत असताना सातपाटी सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत नांदगाव बीचवर सांज रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक होळी सण साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ रिसॉर्टमध्ये धडक मारली असता नवी मुंबई आदी भागातून ऑनलाइन बुकिंगद्वारे ४९ तरुण-तरुणी यांचे ग्रुप आलेले असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सपोनि सुधीर धायाळकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला, तर ४९ पर्यटकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत होळी सण साजरा करताना जमावबंदीचा कायदा तोडल्याप्रकरणी आगरवाडी व माकुणसार येथील प्रत्येकी दोन अशा चार जणांविरोधात केळवे सागरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ५ एप्रिलपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मार्च रोजी काढला होता. केळवे येथे चौघांवर गुन्हे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ५ एप्रिलपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ यांनी २५ मार्च रोजी काढला होता. त्यात हॉटेल्स, रिसॉर्ट, परमिट रूम यावर वेळेचे बंधन घालण्यात आले होते. माकूणसार येथे ८० ते ९० नागरिक जमा केल्या प्रकरणी कमलाकर पाटील व नितीन ओमकार यांच्याविरोधात तर आगरवाडी येथील विकास गावड व प्रकाश गावड यांच्याविरोधात केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि भीमसेन गायकवाड यांनी गुन्हे दाखल केले.
coronavirus: काेराेना नियम धुडकावणाऱ्यांना दणका, हाॅटेलमालकासह ४९ पर्यटकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 1:47 AM