वज्रेश्वरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली येथील देवस्थानांच्या परिसरात शुकशुकाट दिसत आहे. तिन्ही मंदिरे दर्शनासाठी सुरू असली तरी भाविक आणि पर्यटकांची तुरळक उपस्थिती दिसत आहे. येथील गरम पाण्याच्या कुंडात अंघोळीसाठी भाविक गर्दी करत असतात. दरम्यान, मंदिर बंद ठेवण्याबाबत बुधवारी वज्रेश्वरी मंदिर प्रशासन आणि ग्रामस्थ यांची बैठक होणार आहे.तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली येथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक येत असतात. राज्यासह इतर राज्यांतून वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि अकलोली येथील गरम पाण्याच्या कुंडात अंघोळीसाठी भाविक येतात. तर गणेशपुरी येथील नित्यानंद महाराजांच्या समाधी मंदिरात आणि येथील गुरु देव सिद्धपीठ येथे विदेशी पर्यटकही आध्यात्मिक शांतीसाठी येत असतात. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येथे येण्यास भाविक टाळत असल्यामुळे शुकशुकाट आहे. गणेशपुरी येथील समाधी मंदिर भाविकांसाठी खुले असले तरी भाविकांना लांबूनच दर्शन देण्यात येत आहे. वज्रेश्वरी देवी मंदिरात नेहमीप्रमाणे दर्शन सुरू आहे, तर अकलोली येथील गरम पाण्याच्या कुंडातही तुरळक प्रमाणात भाविक येत आहेत. वज्रेश्वरी आणि गणेशपुरी येथील मंदिर प्रशासनाने बंद करण्यासंदर्भात अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत बुधवारी वज्रेश्वरी मंदिर प्रशासन आणि ग्रामस्थांची बैठक होणार आहे.
Coronavirus : कोरोनामुळे सावधगिरी, वज्रेश्वरी मंदिर परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:58 PM