बोर्डी : बोर्डी आणि परिसरातील ग्रामीण भागात दोन दिवसांत सात कोरोना रुग्ण आढळले आहेत. ते सर्व गुजरातच्या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार असून त्यांच्या सान्निध्यातील कुटुंबीयांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ११७ झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संदीप गाडेकर यांनी दिली.गुजरातच्या औद्योगिक वसाहतीत जाणाºया कामगारांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन संक्रमित रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. ती अखेर खरी ठरली असून १ ते ४ जुलैदरम्यान बोर्डीत ५, रामपूर आणि चिखले येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यानंतर तिन्ही गावांतील क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सान्निध्यात आलेल्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले आहे. रेल्वे सेवा बंद असली तरी खाजगी वाहनांनी गुजरातच्या औद्योगिक क्षेत्रात जाणाºया कामगारांचे प्रमाण मोठे आहे. हे सर्व दुचाकीने डबल सीट आणि चार चाकी घेऊन ग्रुपने जातात. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, तेथे लोकसंख्येची अधिक घनता असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर, शनिवारी पावसाला सुरुवात झाल्याने परिसर प्रतिबंधित करताना आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या किनाऱ्यांवर येणाºया स्थानिक पर्यटकांची संख्या अधिक आहे. ते दुचाकीने फिरतात. त्यापैकी तरुणवर्ग ग्रुपने किनाºयावर दारूच्या पार्ट्यांना बसतात. बहुतेक गावात पत्त्यांचा जुगारही चालतो. काही दिवस बीअर शॉप, किराणा दुकाने, गावातील बाजार बंद करण्याची मागणी सजग नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखायचा असल्यास प्रशासनाला कडक धोरण अवलंबणे आवश्यक आहे.
coronavirus: गुजरातच्या औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कामगारांना कोरोना, बोर्डी पंचक्रोशीत फैलाव, रुग्णसंख्या ११७ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 12:06 AM