डहाणू : डहाणू तालुक्याच्या किनारपट्टी भागात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, महावितरणने लॉकडाऊनमधील तीन महिन्यांचे पाठवलेले वीजबिल पाहून येथील ग्राहकांचे डोळे फिरले आहेत. चिंचणी, वाणगाव, वरोर या भागांत फिडरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे आधीच अडचणीतील व्यवसायावर परिणाम होत आहे. येथील नागरिकांना सतत वीज गायब होत असल्याने रात्ररात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे वीजबिले तिप्पट आणि सर्वत्र अंधार अशी स्थिती झाली आहे.कोरोनामुळे आधीच डायनिंगचा व्यवसाय आणि इतर उद्योगधंदे बंद आहेत. त्यातच चिंचणी, वाणगाव, वरोर फिडरवरील सततच्या बिघाडामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यानंतरही महावितरणने वीजबिलाची मनमानी करून दुप्पटतिप्पट आकारणी करून ग्राहकांची लूट सुरू केली आहे. वीजबिले दुरुस्त करण्यासाठी कर्मचारीच न नेमल्याने ग्राहकांना बोईसर येथे हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यात वेळ आणि पैसाही खर्च होत आहे.लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले माफ करण्यची मागणी खासदार राजेंद्र गावित आणि आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. पण, त्याचाही परिणाम झालेला नाही.वीजबिलांत विविध शुल्कांची आकारणी केली आहे. शिवाय, एक ते १०० युनिटपर्यंत प्रतियुनिट तीन रुपये ४० पैसे दर असल्याने, दोनतीन महिन्यांच्या एकत्र वीजबिलाची आकारणी करून १०० युनिटवरील प्रतियुनिट सात रुपये ४३ पैसे याप्रमाणे आकारणी करून लूट सुरू आहे.वीजबिलमाफीबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रीडिंगप्रमाणे एप्रिलपासून वाढलेल्या वीजदरानुसार बिलांची आकारणी केलेली आहे. बिलात काही तांत्रिक चुका असल्यास स्थानिक वीज वितरण कार्यालयात गेल्यास ती ताबडतोब दुरुस्त करून देण्यात येईल.- प्रताप मचिये, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पालघर
coronavirus: तिप्पट वीजबिलांच्या बदल्यात डहाणूकरांच्या वाट्याला अंधार, नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 12:59 AM